१५

भाईजी, मीं त्यांना परवानगी दिली

संध्या, कल्याण, विश्वास, बाळ, रंगा सारींच आतां एकत्र राहात होतीं. तिस-या मजल्यावर ती खोली होती. विजेचे दिवे होते. खोली चांगली लांबरुंद होती. एका खिडकींतून पर्वती दिसे, एका खिडकींतून नदीचें सुंदर पात्र दिसे. सायंकाळचे देखावेहि सुंदर दिसत. परंतु सारें वातावरण शांत असे. तेथें गडबडगुंडा कांहीं नव्हता. रंगा शिवणकाम शिकत होता; तो सकाळीं ७॥ वाजतां जाई, तो १२ ला घरीं येई; पुन्हां एक वाजतां जाई, तो रात्रीं आठ वाजतां येई. त्याला तेथें फार शिकवीत नसत. बटणांचे काच शिवायला देत. रंगाचीं बोटें दुखूं लागत. मध्यें थोडासा वेळ मशिनवर बसूं देत. या गतीनें किती वर्षे शिवणें शिकायला लागतीं, देव जाणे. परंतु जेथें तेथें पिळवणूक आहे. रंगाला सबंध सहा रुपये तेथें मिळत ! आणि दहा तास काम पडे. परंतु करतो काय ?

रंगाचा स्वभाव मोठा आनंदी होता. त्याच्या चेह-यावर खिन्नता कधीं नसे. घरीं येईल व खोलींत हास्य पिकवील. सूक्ष्म विनोद करण्यांत त्याची बुध्दि मोठी हुषार. संध्येप्रमाणेंच तोहि स्वच्छतेचा भोक्ता. व्यवस्थितपणाचा भोक्ता. घरीं आल्यावर तो चपला वगैरे फडक्याला पुसून ठेवी.

बाळची आई त्याला कांहीं पैसे देत असे. लक्ष्मण हा विश्वासचा एक मित्र होता. तो शिकत होता. तो या मित्रमंडळाला कांहीं मदत देई. रंगाचे सहा रुपये. अशा रीतीनें गाडें कसें तरी ढकललें जात होतें.

परंतु विश्वासची प्रकृति पुन्हां बिघडली. त्याला ताप येऊं लागला. कोठून तरी त्या मित्रमंडळानें एक खाट मिळविली. विश्वासचें अंथरूण त्या खाटेवर असे. संध्या त्याची नीट शुश्रूषा करी. पिण्याला कढत पाणी त्याच्यासाठीं ती करून ठेवी. त्याचे कपडे बदली. त्याला सकाळीं थोडा ताजा भात करून जेवायला वाढी. कपाळ फार दुखूं लागलें तर सुंठ उगाळून त्याच्या ती कपाळाला लावी.

“संध्ये, सदा मरे त्याला कोण रडे ? किती तूं करणार माझं ? मला लाज वाटते. नको हें जगणं असं वाटतं.”

“विश्वास, बरा होशील हो. भाईजी पैसे पाठवणार आहेत. मग टॉनिक घे. तुम्हाला क्रान्ति ना करायची आहे ? मग असं काय बोलतोस ? क्रान्ति करूं पाहणा-यानं मरणाची वार्ता काढूं नये. जाईल हें आजारीपण.”
आणि अशीं बोलणीं त्या दिवशीं चाललीं होतीं, तों हरिणी आली.

“ये हरणे ! “संध्या म्हणाली.

“कां ग, आज असा कां चेहरा ?” विश्वासनें तिला विचारलें.

“विश्वास, घरीं सर्वांची बोलणीं खाऊन कंटाळलें मी. दादा बोलतो. मामा बोलतात. करूं तरी काय ? अभ्यासांत लक्ष लागत नाहीं. मामा सारखे लग्नाविषयीं बोलतात. मीं आज त्यांना सांगून टाकलं कीं, पुनश्च माझ्याजवळ लग्नाचं बोलाल तर शपथ. तेव्हां ते मला वाटेल तें बोलले.”

“हरणे, बोलूं देत त्यांना. तूं मॅट्रिकची परीक्षा यंदा पास हो. म्हणजे मग आपण विवाहबध्द होऊं. तुला नोकरी मिळेल. तोंपर्यंत कळ काढ. मी असा आजारी. तुला शिवतांहि येत नाहीं.”

“मी करीन नीट अभ्यास. तूं काळजी नको करूं. यंदा मी पास होईन. मग आपण स्वतंत्र होऊं.”

विश्वास व हरिणी बोलत होतीं. संध्या खालीं नळावर धुवायला गेली. विश्वास व हरिणी यांना संकोच वाटूं नये म्हणून का ती गेली ? संध्या खालीं गेली आहे असें पाहून हरिणीनें खोलीचा केर काढला. तेथें भाजी होती. ती तिनें चिरायला घेतली.

“हरणे, “विश्वासनें हांक मारली.

“काय रे ?” तिनें विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel