“तो तिकडे झाडाखालीं भाता लावून बसला आहे.”

“हीं घे भांडीं. मी आणखी आणतें गोळा करून.”

“मी तिथं देऊन येतों हं.”

विश्वास भांडीं घेऊन आला. कल्याण आनंदला. परंतु पाणी हवें ना ? भांडे चुर्र करायला. विश्वास पुन्हां त्या मुलीकडे आला. तिच्या ओळखींनें एक बादलीभर पाणी घेऊन तो आला. आणखी भांडीहि मिळालीं. संच जमला. कोळसे शिलगले. विश्वास भाता फुंकूं लागला. कोळसे रसरशीत झाले. पहिलें भांडें तापलें. नवसागर पेरून कल्याणनें भराभरा कल्हईची कांडी फिरविली. छान लागली कल्हई. कल्याण सपासप भांडीं तयार करीत होता. फडक्यानें जोरानें घांशी. कल्हई नीट सर्वत्र लागे. एकदां मध्येंच बोट भाजलें. पटकन् तोंडांत घातलें त्यानें. परंतु फिकीर नव्हती. ध्येयाचा उन्माद होता.

भाता फुंकतां फुंकतां विश्वास लाल झाला. जवळ धग होती. त्याचा गोरा चेहरा तापला. गोरा विश्वास लाल झाला. लाल बावटयाला शोभणारा तो दिसूं लागला. त्यानें गाणें सुरू केलें.

“इन्किलाब जिन्दाबाद”

गाणें सर्वत्र घुमलें. तेथें मुलांमुलींची गर्दी जमूं लागली. आणि ती मघांची मुलगी आणखी भांडी घेऊन आली.

“विश्वास, गाणं जरा थांबव. हीं भांडीं त्या भांडयांत मिसळतील हो. अलग अलग ठेवा.”

“बघ कल्हई कशी आहे ती ! “

“छान आहे. संगीत कल्हईवाले पुण्याला प्रथमच आले ! “

“कल्याण !” कोणी तरी येऊन हांक मारली.

कल्याणनें वर पाहिलें व पुन्हां त्यानें भांडे निखा-यांत टाकलें. सांडसानें नीट धरलें.

“कल्याण, हें काम करतोस ?”

“पोटाचा उद्योग.”

“आणि जवळ हीं पुस्तकं कशाला ?”

“तीं आग पेटवणारीं पुस्तकं आहेत.”

“म्हणजे ?”

“तीं क्रांतीचीं पुस्तकं आहेत. समाजवादाचीं पुस्तकं आहेत.”

“तीं बरोबर कशाला ?”

“भांडीं नाहीं मिळालीं तर झाडाखालीं बसून वाचायला.”

“वा ! असे कल्हईवाले नव्हते पाहिले. आमच्याहि आळीत या. देऊं भांडीं.”

“बरं येऊं. विश्वास, चालूं दे तुझं गाणं. त्याच्या नादावर भट्टी पेटते चांगली. मला कल्हई लावायला जोर येतो.”

विश्वास घामाघूम झाला होता. जणूं ते भारताची भट्टी पेटवीत होते. भारताचें तोंड उजळ करीत होते. विश्वास गाणें म्हणूं लागला.

“इन्किलाब जिन्दाबाद”
धन-शोषणकी क्रूर कहाणी
हमे हमेशा रहेगी याद ॥ इन्किलाब०॥

कोळशांची भट्टी पेटली होती व स्फूर्तीचीहि भट्टी पेटली होती. सभोंवतालचीं मुलेंहि गाणें म्हणूं लागली. जणूं तेथें सभाच सुरू झाली. अद्भुत देखावा.

“कल्याण, आतां तूं भाता फुंक. मी कल्हई लावतों.”

“माझा हात बसला आहे. तूं हात भाजून घेशील.”

“भाजूं दे हात. रशियांतील तरुणांनीं हात भाजून घेतले होते. माझाहि भाजूं दे हात. पांढरपेशी हात भाजून काळासांवळा होऊं दे. पाप जळून जाऊं दे. ऊठ.”

कल्याण उठला. त्यानें घाम पुसला. विश्वासचाहि घाम त्यानें पुसला. तें मित्रप्रेम पाहून आसपासचीं मुलें सद्गदित झालीं. आतां विश्वास कल्हई करूं लागला. परंतु कल्याणमध्यें अधिक चपळाई होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel