विश्वास त्याच्याबरोबर गेला. दोघांचें कांहीं तरी बोलणें सुरू झालें. हळूहळू आवाज मोठा होत गेला. विश्वास रागानें बोलत होता. आतां कल्याणहि उठून तेथे गेला. सर्वांचें चांगलेंच भांडण जुंपलें.

“अहो, आज इथं आलों नाहीं तों का पुन्हां जायला सांगतां ? हा काय चावटपणा ? एक महिना तरी आम्ही इथंच राहणार. इथून आम्ही जाणार नाहीं. काय करायचं असेल तें करा. नोटिस द्या आधीं. जा म्हणून तुम्हांला सांगवतं तरी कसं ?” विश्वास म्हणाला.

“अहो, मी पेन्शनर माणूस. माझीं मुलं तिकडे मुंबईला नोकरीचाकरीला आहेत. इथं फक्त ती नि मी. दोघं म्हातारीं माणसं. ते मघां पोलीस आले व विचारू लागले. सांगितलं त्यांना कीं आलं आहे खरं बि-हाड. ते तीनदां तीनदां दाराशीं येतात. आजपर्यंत या घरांत कधीं पोलीस आला नाहीं. आम्हांला या गोष्टींची संवयच नाहीं. शिवाय जगांत लढाई सुरू झालेली. आपलं सरकार लढाईंत पडलेलं. आणि त्यांतून आम्ही पेन्शनर. अहो, एकदम पेन्शहि हे बंद करायचे हो. कांहीं न्याय का राहिला आहे या राज्यांत ? तुम्हांला आम्हीं जागा दिली, हाच भयंकर गुन्हा असं म्हणायचे. म्हणून म्हणतों कीं तुम्ही आपले जा. पुण्याला वाटेल तितक्या तुम्हांला जागा मिळतील. किती तरी नवीन जागा पर्वतीच्या बाजूला झाल्या आहेत. कृपा करा.” तो म्हातारा पेन्शनर सांगत होता.

“अहो, पण तुम्ही सुशिक्षित आहांत नि असे काय घाबरतां ? सरकारनं असं का जाहीर केलं आहे कीं, आम्हांला कोणी घर देऊं नये ? जर कोणी बि-हाडाला जागा देईल त्याला दंड होईल, शिक्षा होईल, असं का सरकारी फर्मान निघालं आहे ? उगीच कां तुम्ही भिता ? आले पोलीस तर येतील आमच्या खोलींत. तुमचं घर का जप्त होणार आहे ?” विश्वास समजावून सांगत होता.

“तसा मी भित्रा नाहीं हो. अहो, माझे चुलते टिळकांच्या राजकारणांत होते. परंतु आतां मी म्हातारा झालों आहें. म्हणून म्हणतों, कीं उगीच नको. तुम्हां तरुणांचं तसं मला कौतुक वाटतं. मीहि आज तरुण असतों, तर तुमच्याबरोबर राहिलों असतों. परंतु वय झालं. आतां चळवळ सुरू होईल असंहि म्हणतात. धरपकडी होतील. आपल्या देशाची तयारीच नाहीं. वास्तविक अशा वेळीं देश स्वतंत्र करायची संधि असते. लोकमान्य असते, तर आज देश स्वतंत्र करते. परंतु टिळक, एकच पुरुष झाला. अहो, मी चुलत्यांबरोबर जायचा त्यांच्याकडे. काय त्या चर्चा व तीं खलबतं. मग केव्हां जातां तुम्ही ? उद्यां गेलेत तरी चालेल. परंतु जा बुवा. वाईट वाटतं मला सांगायला. परंतु आमचं वय झालं. हे पोलीस नको यायला दारांत. सर्व आयुष्यांत जें पाहिलं नाहीं, तें म्हातारपणीं नको पाहायला.”

“आम्ही कांहीं जाणार नाहीं; हा काय फाल्तूपणा ? पोलीस आणा व काढा आम्हांला बाहेर !” कल्याण म्हणाला.

“आम्हीं विश्वासानं तुम्हांला जागा दिली. परंतु तुम्ही असे असाल हें काय बरं आम्हांला माहीत ? जरा शंका आली, कीं हे रात्रीचं सामान कां आणतात ? परंतु म्हटलं दु:खांत आहेत. वेळ नसेल जात. आणीत असतील सामान. पण जेव्हां सकाळी पोलीस आले. तेव्हां प्रकाश पडला. तुम्ही आधींच सांगतेत, तर मीं जागा दिली नसती. इतके दिवस रिकामी आहे, आणखी काहीं दिवस पडती. आणि भाडयाचा लोभ थोडाच आहे मला ? चांगली पेन्शन आहे. मुलं चांगलीं रोजगारी आहेत. परंतु म्हटलं सोबत होईल. आम्ही दोन पिकलीं पानं घरांत. हांक मारायलाहि कुणी नाहीं. तुम्ही बरेच मित्र मित्र होतां. बरं झालं असतं. आमच्या हिला तर काल तुम्ही बोलत होतेत तिच्याजवळ तर किती बरं वाटलं. म्हणाली, कशीं छान आहेत मुलं. परंतु उपयोग काय ? तुम्ही हे असे उपद्व्यापी. कांही करा. जा. या पांढ-या केंसांची तुम्हांला प्रार्थना आहे.” म्हातारा गयावया करून म्हणाला.

कल्याण व विश्वास खोलींत आले. रंगाहि खूप रागावला होता. काल येथें सामान आणलें. आतां आज पुन्हां कोठें मिरवणूक काढायची ? आणि नवीन घर पाहूं तेथेंहि हेच प्रकार झाले तर ? कोठें तरी ठाण मांडून बसलेंच पाहिजे. हा काय चावटपणा ! असे त्यांचे विचार चालू होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel