तिस-या प्रहरीं घराचा मालक आला व म्हणाला :

“हें पाहा कल्याण, उद्यां सकाळीं कदाचित् तुमच्याकडे पोलीस येतील. झडती होईल असं कळतं. मी सूचना देत आहें. तुम्हांला मी कधींचा सांगतों आहें कीं, घर खालीं करा म्हणून. या विश्वासच्या एका मित्राच्या आग्रहानं मीं घर तुम्हांला दिलं. परंतु या अशा इतक्या भानगडी असतील हें नव्हतं मला माहीत. आतां हा सारा तमाशा होणार.”

“परंतु त्यांत तुम्हांला थोडीच तकलीफ आहे ? तुम्हांला कांहीं दंड वगैरे होणार नाहीं. कोणी तुम्हांला तुरुंगात नेणार नाहीं. येतील आमच्या घरीं, पाहतील, जातील.” कल्याण म्हणाला.

“परंतु तुम्ही लौकर दुसरीकडे पाहा बि-हाड.” असें म्हणून मालक गेला.

आणि दुस-या दिवशीं खरेंच उजाडत सहा साडेसहाला पोलीस आले. त्या एकाच वेळीं पुण्याला दहाबारा ठिकाणीं झडत्या झाल्या. कल्याणच्या खोलींत कांहीं सांपडलें नाहीं. सेवादलाच्या घटनेचे कांहीं कागद होते, तेच जप्त करून पंचनामा करून नेण्यांत आले.

कल्याणच्या खोलींत पोलीस होते. खालीं दरवाजावरहि पोलीस होते. वाडयांतील मंडळींना जरा आश्चर्य वाटलें. मालकाचीं मुलें वर येऊं पाहात होतीं, परंतु त्यांना घरीं बसविण्यांत आलें.

“कुठं चाललेत रे वर ? ते पोलीस आले आहेत, दिसत नाहीं का ? खबरदार खोलीच्या बाहेर पडाल तर ? त्यांच्याकडे जात जाऊं नका म्हणून सतरांदा सांगितलं होतं. बसा निमूटपणं ! “मालक मुलांना सांगत होते.

पोलीस गेले तरीहि मालकाचीं मुलें बाहेर आलीं नाहींत. आपल्याशीं यांचा संबंध आहे असें पोलिसाला वाटूं नये म्हणून ही एवढी काळजी ! पोलीस गेल्यानंतर ब-याच वेळानें मालक कल्याणच्या खोलींत आला.

“कांहीं नेलं का हो जप्त करून ?” त्यानें विचारलें.

“हो; पिस्तुलं नेलीं.” संध्या हंसत म्हणाली.

“पिस्तुलं ?” मालक घाबरून विचारता झाला.

“नाहीं हो; एक चिटोरं नेलं त्यांनीं. कांहीं सांपडलं नाहीं.” कल्याण म्हणाला.

“परंतु माझं ऐका, तुम्ही जागा खालीं करा. मी तुमच्या पायां पडतों. हे लढाईचे दिवस आहेत. उगीच नको त्रास. आम्ही कुटुंबवत्सल माणसं. पिस्तुलांची आज थट्टा केलीत. खरींसुध्दां असायचीं तुमच्याजवळ; नाहीं तर एकदम तोच शब्द थट्टेनं का होईना, यांच्या तोंडांतून कसा बाहेर पडला ? कृपा करा बुवा.” मालक दीनवाणेपणानें म्हणूं लागला.

“दोन दिवसांत हें घर खालीं करून देतों; काळजी नका करूं.” विश्वास म्हणाला.

“मी आजच बाहेर पाटी लावतों कीं घर भाडयानं देणं आहे म्हणून.” मालक म्हणाला.

मालक निघून गेला. कल्याण, संध्या, विश्वास, भाईजी सारीं सचिंत बसलीं होतीं.

“कल्याण, चला बाहेर पडूं. घरं शोधायला जाऊं.” विश्वास म्हणाला.

“चला.” कल्याण म्हणाला.

“संध्ये, तुझीं पिस्तुलं बाधलीं.” विश्वास म्हणाला.

“तें एक निमित्त कारण झालं; किती तरी दिवस हा मालक सांगतो आहे कीं घर खालीं करा म्हणून.” संध्या म्हणाली.

“किती भित्रीं हीं माणसं ! दिसतात तर सुशिक्षित.” भाईजी म्हणाले.

“सारं हिंदुस्थानच भित्रं आहे. दीडशें वर्षं गुलामगिरींत राहिल्यानं आत्मा जसा मरून गेला आहे. आपण किडे झालों आहोंत, किडे ! “न आदमी रहे हम मकोडे बने” हें खरं आहे.” विश्वास म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel