कल्याणची व विश्वासची भेट झाली. कल्याणची दुबळी प्रकृति पाहून विश्वासला वाईट वाटलें. विश्वासची प्रकृति छान होती. तो राजबिंडा दिसत होता. तो जरा उंच झाला होता. अंगानेंहि जरा जाड झाला होता. एकदम त्याच्यांत वाढ झाली. हालअपेष्टा होत्या. खाण्याची भ्रांत असे. तरीहि त्याला न जुमानतां वाढण्याचें वय होतें म्हणून त्याचें शरीर वाढलेंच.

“कल्याण, तूं आजारी आहेस ?”

“होय, या आजारीपणाचा कंटाळा आला.”

“औषध ?”

“स्वस्थ पडून राहणं हेंच मुख्य औषध. होईन आतां बरा. गुण पडत आहे. तूं अकस्मात् कसा आलास ? कुठं असतोस ?”

“प्रथम नगर जिल्ह्यांत हिंडत होतों. परंतु इकडे खानदेशांत अतिवृष्टीमुळं सारीं पिकं बुडालीं. भाईजी म्हणून एक इकडे कार्यकर्तें आहेत. ते शेतक-यांना सारासूट मिळावी म्हणून प्रचार करीत होते. तालुक्यांतून गटागटांच्या सभा घेत होते. त्यांना दुस-या कोणाचा पाठिंबा नव्हता. त्यांच्या कामांत मदत करण्यासाठीं म्हणून मी आलों. त्यांना आनंद झाला. त्यांच्या बरोबर मी खानदेशभर हिंडलों. नवीन तरुण मित्र जोडले. खूप प्रचार करून सर्व जिल्ह्यांतील शेतक-यांचीं आम्हीं प्रचंड सभा घेतली. ४०।५० हजार शेतकरी जमले असतील. शेतक-यांच्या शेंकडों बाया कित्येक मैल पायीं चालत आल्या होत्या. शेतक-यांचीं मुलं गाणी गात पायीं आलीं होतीं. अपूर्व सभा. परंतु सरकार कांही देणार नाहीं हें खरं. पण संघटनेचा श्रीगणेशा या दृष्टीनं आपण पाहायचं. खरं ना ?”

“त्या भाईजींचीं मतं काय आहेत ?”

“भाईजी संक्रमणावस्थेंत आहेत. ते म्हणतात, “अमुक एका पक्षाचा शिक्का असा माझ्या कपाळावर नाहीं. सहानुभूति हा माझा धर्म. जिथं दु:ख आहे, अन्याय आहे, जुलूम आहे, तिथं जावं, झगडावं, हें माझं ब्रीद.” ते धर्मशील आहेत. परंतु त्यांचा धर्म गंधभस्मांचा नाहीं. परमेश्वरावर त्यांची फार श्रध्दा आहे. ईश्वराचं नांव घेतील व सद्गदित होतील. परंतु त्यांचा धर्म दुबळा नाहीं. त्यांचा धर्म समाजवादी कार्यक्रमाच्या आड येत नाहीं. महर्षि सेनापति बापटांप्रमाणं ते म्हणतात, “तुमच्या समाजसत्तावादाच्या पाठीमागं, तुमच्या मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या पाठीमागं माझा एक श्रीहरि ठेवा म्हणजे झालं.” परंतु मला
ते आवडले.”

“शंकराचार्यांनीं बुध्दांच्या शून्यापाठीमागं परब्रह्म ठेवलं, त्याप्रमाणंच हे भाईजी एक श्रीहरि ठेवूं इच्छितात. होय ना ? शून्यवादी नागार्जुन व ब्रह्मवादी शंकराचार्य जवळ जवळ सारखेच असं कोणी म्हणतात. परंतु विश्वास, खरं सांगूं का, हे देव मानणारे लोक केव्हां दगा देतील याचा नेम नाहीं. ते मुद्दाम दगा देतील असं नाही. परंतु त्यांच्या एकांगी वृत्ति, त्यांच्या उत्कट भावना, आंतरिक प्रेरणा इत्यादि गोष्टी पुष्कळ वेळां अडचणी उत्पन्न करतात.”

“विश्वास, मला आपलं वाटतं कीं शक्य तितकं सर्वांशीं सख्य जोडून आपलं घोडं पुढं दामटावं. आपलं तत्त्व सोडूं नये म्हणजे झालं. इतर पक्षांचे लोक प्रचारार्थ नाना युक्ति योजतात. राष्ट्रांतील प्राचीन अर्वाचीन विभूति ते स्वत:च्या पक्षाच्या समर्थनार्थ उपयोगितात. आपणहि त्या विभूतींचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्या व्यक्तींतील क्रांतिकारकत्त्व आपण दाखवलं पाहिजे. श्रीकृष्ण क्रांतिकारक होता, शेतक-यांची, गोपाळांची बाजू घेणारा होता; रामचंद्र वानरांची म्हणजे दडपलेल्यांची बाजू घेणारा होता; भगवान् बुध्द बहुजनसमाजासाठीं उभे राहिले; श्रीशिवाजी महाराजांनीं बहुजन समाजाचं काम अंगावर घेतलं, म्हणून ते क्रांति करूं शकले. अशा रीतीनं आपण सारा इतिहास आपल्या बाजूला उभा केला पाहिजे. जवाहरलाल यांनीं म्हटलं होतं एकदां कीं परंपरेशीं अजिबात संबंध तोडून भागणार नाहीं. परंपरेंतून नवीन विचार पाजा. कल्याण, भाईजींचं असंच म्हणणं. ते म्हणतात, “मी वेदांतून साम्यवाद, समाजावद शिकवीन; गीतेंतून शिकवीन. तुकारामांच्या अभंगांतून शिकवीन.” मी म्हणतों ठीक. त्यांच्यासारख्यांचाहि आपण उपयोग करून घेऊं या. जनतेची मनोरचना आपणांसारख्या केवळ बुध्दिवाद्यांना, केवळ पुस्तकी पंडितांना कळत नसते, हें खरं. अभ्यासमंडळांत सिध्दान्त चर्चावे, समजून घ्यावे; परंतु खेडयांतील जनतेसमोर निराळयाच रीतीनं सारं मांडलं पाहिजे. जुन्या आजीबाईला चहाच पाजायचा, परंतु तो रामपात्रांतून पाजायचा. तिला कपबशी नाहीं चालत. काय पाजायचं हा मुख्य प्रश्न. कशांतून पाजायचं हा मुख्य प्रश्न नाहीं. कल्याण, एकदां आम्ही भाई लोक एका प्रचंड सभेंत बोलत होतों. शेतकरी झोंपूं लागले; परंतु भाईजी उठले व त्यांच्यांत उत्साह संचारला. भाईजी साध्या साध्या गोष्टी सांगूं लागले. “या रे गाऊं सारे गान । या रे उठवूं सारें रान ॥ खान्देशचा जागा झाला आज किसान” हें गाणं त्यांनीं एकदम म्हटलं व ते चरण गुणगुणत लोक घरीं गेले. आम्हांला आश्चर्य वाटलं. किसानांतील प्रचाराचं तंत्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे.”

“विश्वास, लेनिनचं असंच म्हणणं होतं, नाहीं ? शत्रूशीं लढतांना सर्व साधनं हातीं घ्यावीं. केवळ तत्त्वं तत्त्वं म्हणत बसूं नये. जर्मनीजवळ १९१७ मध्यें तह घडवून आणतांना वाटाघाटी करायला जाणा-या मित्रानं लेनिनला विचारलं, “कोणता पोषाख करून जाऊं ?” तर महात्मा लेनिन म्हणाला, “ज्या पोषाखानं कार्य सिध्दीला जाईल असं वाटत असेल, तो घाला. पोषाखासाठीं तह अडायला नको.” खरं ना ?”

भेट चालली होती. अधिकारी जरा कामासाठीं गेले होते. ते परत आले. दोघे मित्र जरा थांबले.

“चालूं द्या बोलणं” अधिकारी सस्मित बोलला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel