“परंतु यश येण्याची आशा नाहीं.” विश्वास म्हणाला.

“अच्छा. आम्ही जातों.” ते नवीन मित्र म्हणाले.

कल्याण, विश्वास त्यांना दारापर्यंत पोंचवायला गेले. नंतर पुन्हां ते वर आले.

“काय, भाईजी, केव्हां जाणार ?”

“माझ्या जाण्याची तुम्हांला घाईशी ?”

“जाण्याआधीं मेजवानी करूं.”

“कसली ?”

“शिकरणीची.”

“संध्या घरीं आल्यावरच मीं जायचं ठरवलं आहे.”

“तिनं तुमचा निश्चय चालूं दिला नाहीं एकूण ?”

“तिच्यापुढं माझा निश्चय कसा टिकेल ? कल्याण, संध्येला आतां घरीं बाळंतिणी असतात. त्यांचीं मुलं पाहून संध्येला स्वत:चं
बाळ आठवतं. ती दु:खी होते. ती घरीं येऊं दे. इथं लौकरच बरी होईल. हंसेल, खेळेल.”

“भाईजी, मला तर लौकरच बाहेर जावं लागणार. संध्या घरीं येईल. परंतु मी तिच्याजवळ राहूं शकणार नाहीं. हरणी आहे. रंगा आहे. ढकलतील गाडा. पक्षाची शिस्त मला पाळली पाहिजे. घरीं कसा राहूं ?”

“विश्वास काय करणार ?”

“तो बाहेर राहूनच पक्ष वाढवणार. सध्यां तरी असं ठरवलं आहे.”

“नाहीं, तुम्ही फार दिवस बाहेर राहाल असं मला वाटत नाहीं. तयारीनं असा. संध्या, हरणी यांची जी व्यवस्था करायची असेल, ती करून ठेवा.” भाईजी म्हणाले.

“व्यवस्था काय करायची व आम्ही काय करूं शकूं ? धडपडतील त्याहि. स्वत:ची व्यवस्था त्या स्वत:च करून घेतील. त्यानंच त्यांचा विकास होईल. त्यांना आत्मविश्वास येईल. संध्येची मला काळजी नाहीं. कदाचित् ती आईकडेहि जाईल. ती न गेली, तर तिची आई येऊन तिला कदाचित् घेऊनहि जाईल.” कल्याण म्हणाला.

“आणि हरणी शिकणार आहे. शिकूं दे तिला. एकदां वाटत होतं कीं तिनंहि हिंडावं फिरावं. परंतु तिला एकटीला तितकं धैर्य होईल असं नाहीं वाटत. अजून तसा तिला कधीं अनुभव नाहीं, संवय नाहीं. परंतु तिला न राहवलं, तिला स्फूर्ति आली, तर तिनं खुशाल जावं सारं सोडून, जावं गाणीं गात गांवोगांव, सभा घेत गांवोगांव.” विश्वास म्हणाला.

“हरणी गेली कुठं ?”

“तिच्या आईनं तिला बोलावलं होतं म्हणून गेली आहे. माझे वडीलहि तिला शिकण्यासाठीं मदत करायला तयार आहेत. म्हणाले, तूं नाहीं बी.ए. झालास, तर ती तरी होऊं दे. मुलगा नाहीं बी.ए. तर सून तरी. हरणीच्या आईचीहि इच्छा आहे. जर कुठं नोकरी मिळाली मध्येंच तर तिनं करावी. संध्येनं व तिनं एकत्र राहावं.” विश्वास म्हणाला.

“रंगाहि त्यांच्याबरोबर राहील.” कल्याणनें सांगितलें.

“तुमचा रंगा खरंच मोठा प्रेमळ. आणि त्याला सारं समजतं. त्याच्या सारं लक्षांत येतं. जेवतांना विश्वास, तूं पाहिली आहेस का त्याची गंमत ? मी काय करायचा, कीं दुपारची उरलेली भाकर वगैरे जेवायला बसतांना ताज्या भाकरीच्या खालीं ठेवायचा; आणि ती तुम्हांला नकळत पटकन् मी घ्यायचा. रंगाच्या हें ध्यानांत आलं. त्यावेळेपासून तो आधींच ती घेऊन टाकतो. परवां हळूच बाजूला शिळा भात ठेवला होता. परंतु रंगानं तो उचलून घेतला. त्याला हृदय आहे. पुन्हां न बोलतां सारं करील. संध्या, हरणी यांना त्याचा आधार होईल. राहतील तिघं.” भाईजी म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel