“अग, सव्वाशेंची ऑर्डर मिळाली.” कल्याण म्हणाला.
“खरंच का ?” संध्येनें उठून विचारलें.
“खरंच, ही बघ ! “तो म्हणाला.
“आज दोन घांस जास्त खा.” ती म्हणाली.
मोठी ऑर्डर मिळाली म्हणून सर्वांना आनंद झाला. रंगाहि जरा लौकरच आज आला. सारीं एकदम जेवायला बसलीं.
“रोज अशी एक ऑर्डर मिळाली तर किती छान होईल ?” विश्वास म्हणाला.
“निदान इतक्या रुपयांच्या ऑर्डरी रोज मिळायल्या हव्यात.” कल्याण म्हणाला.
“परंतु दादा, ही ऑर्डर खरी असेल का ?” रंगानें संशय घेतला.
“तो चांगला होता तरुण. विद्यार्थी आहे. एल्.एल्.बी.च्या वर्गांतला. लांबचा आहे. उमरावती-अकोल्याकडचा. तिकडचे लोक श्रीमंत असतात.”
“त्यानं ऍडव्हान्स दिला का ?”
“संध्याकाळीं त्याच्याकडे जायचं आहे. तो असाच एके ठिकाणीं भेटला. त्याच्याजवळ तेंव्हा पैसे नव्हते. परंतु माल कोणता कोणता पाहिजे तें टिपून घेतलं.”
“आज मी बरोबर होतों म्हणून अशी ऑर्डर मिळाली. संध्ये, माझा पायगुण.” विश्वास म्हणाला.
“रोज तूंच जा हिंडायला. पायगुण दिसूं दे रोज.” ती म्हणाली.
“विश्वास, आमटी घे कीं आणखी.” भाईजी म्हणाले.
“आज मला केवढी मोठी वाटी तुम्हीं ठेवली आहे ! ही वाटी का वाटेश्वर ?”
“पोटभर आमटी पीत जा. तें तुझं टॉनिक.” संध्या हंसून म्हणाली.
“संध्ये, भाईजींची आमची खरंच मला आवडते. सारं पातेलं पिऊन टाकावंसं वाटतं. परंतु तुम्ही नांवं ठेवाल, हंसाल, म्हणून मी भितों.” विश्वास म्हणाला.
“पातेलंभर नको पिऊं, सध्यां वाटीभरच पुरे.” भाईजी म्हणाले.
“तुम्ही असा माझा सूड नका घेऊं. तुमची दृष्ट पडेल हो माझ्यावर ! “विश्वास हंसून म्हणाला.
गप्पागोष्टी होत जेवणें झाली. रंगा थोडया वेळानें दुकानांत जायला निघाला. तों संध्येनें त्याला कांहीं तरी कानांत सांगितलें. रंगा हसला.
“काय रे रंगा सांगते आहे ?” कल्याणनें विचारलें.
“रंगा, आळीमेळी हं !” संध्या म्हणाली.
रंगा हंसून निघून गेला.
“काय ग सांगितलंस आणायला ?” विश्वासनें विचारलें.
“कोबीचा कांदा, दुसरं काय ?” कल्याण म्हणाला.
“नाहीं तर सोनचांफ्याची फुलं असतील.” विश्वास बोलला.
“तुम्हांला नाहींच ओळखतां येणार.”
“मी ओळखूं, संध्ये ?” भाईजींनीं विचारलें.
“ओळखा हो ?” संध्येनें आव्हान केलें.
“रंगा आहे शिवणकामाच्या दुकानांत. दुकानांत चिंध्या असतात पुष्कळ. कापडाचे तुकडेटाकडे उरतात. ते आणायला सांगितले असशील. होय ना ?” भाईजी म्हणाले.