“चिंध्या कशाला ?” कल्याणनें विचारलें.
“तुला गोधडीबुवा करायला ?” विश्वास म्हणाला.
“शेगडी पेटवायला पाहिजे असतील. होय ना ?” कल्याणनें विचारलें.
“भाईजी, बोलूं नका हं ? माझ्या चिंध्या असोत कीं कांहीं असो. तुम्हांला काय पंचायती ?” संध्या म्हणाली.
दुपारीं भाईजी भाषांतर करीत बसले. कल्याण व विश्वास बाहेर जायला निघालें.
“इतक्या उन्हांतून कुठं जातां ?” संध्येनें विचारलें.
“एके ठिकाणीं आमची बैठक आहे. “
“आणि त्या ऑर्डर देणा-याकडे जायचं आहे ना ? विसराल हो.” तिनें आठवण दिली.
“नाहीं विसरणार.”
“भाईजी, तुम्हांला भाषांतराचं काम चांगलं मिळालं कीं नाहीं ?” कल्याणनें विचारलें.
“मनाजोगं.” ते म्हणाले.
“तुम्ही असेच कोंप-यांत बसा व आम्हांला खूप लिहून द्या.” कल्याण म्हणाला.
“नाहीं; भाईजींना प्रचारासाठीं बाहेर काढलं पाहिजे. कल्याण, त्या दिवशींचं विद्यार्थ्यांच्या सभेंतलं त्यांचं भाषण किती सुंदर झालं ! सारं वातावरण त्यांनीं गंभीर व उत्कट केलं. आरंभीच्या वक्त्यांच्या भाषणांनीं सभेंत पोरकटपणा उत्पन्न झाला होता. परंतु भाईजी बोलूं लागले व एकदम चमत्कार झाला. भाईजी, तुम्ही कोंप-यांत नका बसूं. तुम्ही स्वत:च्या शक्ति वायां दवडीत आहांत. तुम्हांला कोणी उत्तेजन देणारं मिळालं नाहीं, म्हणून हें असं झालं. आम्ही तुम्हांला महाराष्ट्रभर नेऊं. तुम्ही सारं वातावरण चेतवाल.” विश्वास म्हणाला.
“विश्वास, पूर्वीसुध्दां तूं एकदां भाईजींना बरोबर घेऊन हिंडायचं ठरवलं होतंस. तो निश्चय तसाच राहिला. आजचंहि म्हणणं तसंच राहील. पैशाशिवाय सा-या गोष्टी फोल आहेत. आणि तो प्रयत्न तर आपला फसला.” कल्याण म्हणाला.
“पुन्हां प्रयत्न करूं. आतां मी पुढाकार घेईन.” विश्वास म्हणाला.
“नकोत ते प्रयत्न.” भाईजी म्हणाले.
“बसा तर कोंप-यांत खरडीत ! “विश्वास रागानें म्हणाला.
दोघे मित्र निघून गेले. थोडया वेळानें सायकलवरून रंगा आला. चिंध्या घेऊन आला. छान छान चिंध्या. आणि सुंदर सुंदर कापडांचे उरलेले लहान लहान तुकडेहि होते. रंगा देऊन निघून गेला.
“भाईजी, ही पाहा संध्येची चिंध्यांची संपत्ति. या, आपण निवडूं.” संध्येनें हांक मारली.
निरनिराळया रंगांचे तुकडे त्यांनीं अलग अलग केले. मोठे तुकडे अलग केले. बारके बाजूला काढले. संध्या व भाईजी चिंध्यांत रंगून गेलीं होतीं.
“संध्ये, या लहान लहान त्रिकोणी तुकडयांच्या आपण चिमण्या करूं. मला छान येतात चिंध्यांच्या चिमण्या करायला. पाळण्यावर लावायला होतील, नाहीं ? छान आहेत चिंध्या, रंगारंगांच्या.”
“भाईजी, या मोठया तुकडयांचं मी काय करणार आहें. माहीत आहे ? यांचीं दुपटीं शिवीन. चित्रविचित्र रंगीत दुपटीं. छान दिसतील, नाहीं ?”
“आणि हे तुकडे बाजूला कां काढले आहेस ?”