भाईजी मात्र जागे होते. त्यांना फार आनंद झाला होता. देवानें आपली व संध्येची प्रार्थना का ऐकली, असें त्यांच्या मनांत आलें. परंतु तो अहंकार क्षणांत दूर गेला. आपण प्रार्थना न केल्या तरीहि देवाला जें होऊं नये असें वाटत असेल, तें तो होऊं देणार नाहीं. त्याच्या विश्वाच्या विकासमार्गांत जें सोडणें, तोडणें, जें जोडणें, सांधणें, त्याला योग्य दिसेल तें तो करवून घेईल. मानवाला तें क्रूर दिसो वा हिडीस वाटों. बरें वाटो वा बुरें वाटो. भाईजी पुन्हां शांत व गंभीर झाले. परंतु त्यांनीं हात जोडले व आपलें डोकें लवविलें. देवा, सांभाळ तुझीं हीं मुलें. त्यांना उत्साह दे. त्यांच्या हातून तुला आवडणारेंच काम होऊं दे. त्यांना निराश नको करूं. अशी त्यांनीं प्रार्थना केली  व

“नेदी दिसों केविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें”

हा आपला आवडता अभंगचरण त्यांनीं मनांत कितीदां तरी म्हटला व तो गुणगुणतच तेहि शांतपणें झोंपले.

“दादा, डेक्कन जिमखान्यावर तुला एके ठिकाणीं ते कापडाचे नमुने घेऊन एकानं बोलावलं आहे. काय त्यांचं नांव--” रंगा सांगूं लागला व आठवूं लागला.

“मला माहीत आहेत ते गृहस्थ. जाणार आहें त्यांच्याकडे; विश्वास, तूंहि येतोस ना ? आज दोघे जाऊं.” कल्याण म्हणाला.

“जाऊं. दोन तास येऊं हिंडून ! “विश्वासनें उत्तर दिलें.

“जरा गोड बोलत जा विश्वास, गि-हाईकाजवळ; नाहीं तर तूं संतापायचास व उठाव झेंडा बंडाचा तिथंच म्हणूं लागायचास !

“संध्या म्हणाली.

“तूंच जा कीं गोडूबाई हिंडायला आणि आण ऑर्डरी.”

“जाईन हो. मला कांही त्यांत लाज नाहीं वाटत.”

“लाज वाटायचा प्रश्न नाहीं. ऑर्डरी मिळवण्याचा आहे.”

“विश्वास, परत केव्हां याल ? संध्येला मग भूक लागते.” भाईजींनीं विचारलें.

“उशीर झाला तर तुम्ही बसा.” कल्याण म्हणाला.

ते दोघे हिंडायला गेले. कापडाचे नमुने घेऊन गेले. रंगा दुकानांत गेला. संध्या तांदूळ निवडीत होती. भाईजी विस्तव पेटवीत होते. इतक्यांत मालक वर आला.

“गेले वाटतं बाहेर ?” त्यानें विचारलें.

“हो, आतांच गेले.” संध्या म्हणाली.

“एक बातमी सांगायला आलों होतों.” तो म्हणाला.

“कसली ?”

“आपल्या घराभोंवती अलीकडे पोलीस हिंडतात-फिरतात. मला वाटतं कीं तुमच्या जाण्यायेण्यावर त्यांची टेहळणी असते.”

“अहो, आम्हांला तें माहीत आहे. त्याची कांही काळजी नको. आम्हांला संवयच आहे ह्या सा-या गोष्टींची.”

“तुम्हांला काळजी नाहीं, पण आम्हांला आहे. अहो, आज बाहेर बाहेर हिंडताहेत. उद्यां घरांत येऊन ठाणं द्यायचे. तुम्ही जरा जपूनच राहा, एवढंच मला सुचवायचं आहे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel