दु:खापाठीमागून दु:खें

संध्येचे वडील भीमराव हे चमत्कारिक वृत्तीचे होते. ते फार बोलत नसत. फार हंसत नसत. ते नेहमीं एकटे एकटे असायचे. त्यांच्या मनांत काय चाले तें त्यांचें त्यांनाच माहीत. स्वत:चें मन त्यांना तरी नीट कळलें होते कीं नाहीं, देव जाणे. ते स्वत:च्या पत्नीशींहि कधीं बोलत नसत. एवढेंच नव्हे, तर स्वत:च्या मुलांशींहि प्रेमळपणें कधीं बोलत नसत. संध्या आतां सोळा वर्षांची होती. तिची लहान पाठची भावंडें होती. परंतु पित्यानें त्यांना कधींहि जवळ घेतले नाही, मांडीवर खेळवलें नाही.

“संध्ये बाळ, इकडे ये.” त्या दिवशीं पित्यानें प्रेमानें हांक मारली.

“काय बाबा ?” तिनें जवळ जाऊन विचारलें.

“तूं शाळेवर झेंडा कशाला लावलास ?”

“त्यांत काय झालं, बाबा ?”

“पोलिस आपणाला धरून नेतील. तूं लहान म्हणून तुला सोडतील; परंतु आम्हांला नेतील. तुझे काका तुरुंगांत गेले तर ते बरं
का ? मग काकू रडत बसेल. मुलं रडतील. तुझी आजी रडेल. असं नको करीत जाऊं, बाळ.”

“बाबा, हल्ली तर पुष्कळच लोक तुरुंगांत जातात ना ?”

“हो.”

“त्यांच्या घरीहि रडत असतील सारीं ?”

“मला काय माहीत, बाळ ?”

“बाबा, आज मला तुम्ही बाळसं म्हटलंत ?”

“वाटलं कीं, बाळ म्हणून आज हांक मारावी.”

“परंतु मी कांहीं आतां बाळ नाहीं.”

“मग का मोठी झालीस ? करून टाकूं लग्न ?”

“नको. लग्न नको. मी लहानच आहें. बाबा, तुम्ही आम्हांला कधींसुध्दां जवळ घेत नाहीं. पाठीवरून हात फिरवीत नाहीं. काका माझ्या केंसांवरून हात फिरवतात व म्हणतात रेशमासारखे आहेत संध्येचे केस. तुम्ही कां नाहीं कधीं आमचं कौतुक करीत ? काका आपल्या मुलांना मांडीवर घेतात. तुम्ही कां नाहीं आपल्या लहान शरदला घेत ? आम्ही तुम्हांला आवडत नाहीं ?”

“आवडतां हो.”

“पण तुमचं प्रेम तर दिसत नाहीं.”

“माझं प्रेम मनांत असतं. मी मनांत म्हणतों, देवा, माझीं मुलं सुखी ठेव. त्यांना सद्बुध्दि दे. तुमच्यासाठीं मी सारखा जप करीत असतों हो संध्ये.”

“बाबा, देव आहे का हो ?”

“हो, आहे.”

“कल्याण म्हणे, कीं देव नाहीं.”

“हा कल्याण कोण ?”

“तो आपल्या गांवांतील मुलांना मागं कवाईत शिकवायला येत असे. कुस्तींत त्याला ढाल मिळाली. तो आतां पुण्याला आहे. जवळच्या सुपाणी गांवचा तो. ते असो. पण खरंच का देव आहे ? कुठं राहतो तो ? कोणाला भेटतो ? “

“भक्ताला भेटतो.”

“आजपर्यंत कितीजणांना भेटला ?”

“मी काय सांगूं, संध्ये ?”

“परंतु कोटयवधि लोकांना तर नाहीं भेटला. त्याच्या आवडत्या लोकांना भेटला. असा कसा पक्षपाती देव ? आई का अशी असते ? कांहीं तरीच. त्या देवाचं घर कुठं आहे ? त्याचे कपडे कसे असतात ? रंग कोणता ? सांगा ना !”

“संध्ये, मला कांही माहीत नाहीं. मी राम राम म्हणतों. मला बरं वाटतं.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel