“भाईजी, तुम्ही म्हणजे आमचं अंतिम प्राप्तव्य असं आम्हांला वाटत नाहीं. आमच्या ध्येयाकडे जात असतांना, माझ्यावर प्रेम करतां त्याचा फायदा आम्ही अवश्य करून घेऊं. आम्ही प्रेमबीम जाणत नाहीं. शेवटीं त्याचा बळीं देतों. माझ्या एका मित्राच्या बहिणीवर एका श्रीमंताचं प्रेम बसलं होतं. परंतु त्या बहिणीचं दुस-या एका दरिद्री तरुणावर प्रेम होतं. माझा मित्र आपल्या बहिणीला म्हणे, “कसलं प्रेम घेऊन बसलीस ? कर या श्रीमंताशीं विवाह. तो दहा हजार रुपये देतो आहे. आम्हांला प्रचाराला होतील. कर त्याच्याशींच विवाह. त्याला प्रेमानं वश करून घे व आम्हांला आमच्या कार्यासाठीं तुझी सारी इस्टेट हळूहळू देऊन टाक.” त्याच्या बहिणीला तें पसंत पडलं नाहीं. तो बहिणीवर रागावला. बहीण ऐकेना. तिनं आपल्या दरिद्री प्रियकराशींच विवाह केला. तेव्हांपासून माझा मित्र बहिणीच्या घरींहि जात नाहीं. तिच्याशीं तो बोलत नाहीं. “जी बहीण माझ्या ध्येयार्थ उपयोगी पडली नाहीं, संधि आली असतांहि जिनं ती संधि लाथाडली, ती बहीण काय कामाची ?” असं तो म्हणतो. असे आम्ही लोक आहोंत.”

“विश्वास, काय सांगतो आहेस तूं ? अरे, ही दृष्टि एकदां घेतली कीं, जगांत सारं शून्य होईल. आपल्या पत्नीलाहि मग वेश्याव्यवसाय करायला सांगावा व मिळवावे कामाला पैसे.”

“भाईजी, तो निस्संग व अनासक्त वेश्याव्यवसायहि मी पवित्र मानीन. कबिराची पत्नी लोथी आपण होऊन नाहीं का श्रीमंताकडे जायला निघाली ? स्वत: कबीरानं तिला खांद्यावरून नेऊन पोंचविली.”

“संतांच्या गोष्टी तुम्ही नका बोलूं.”

“आम्ही कांहीं संत नाहीं; ध्येयाशिवाय ज्यांना दुसरं कांहीं दिसत नाहीं, असं सतीचं वाण हातीं घेतलेले आम्हीहि आहोंत. तुम्ही कांहीं तरी बोललेत म्हणून मला बोलावं लागलं. ध्येयासाठीं आम्ही प्रेमाचाहि बळी देतों, एवढंच माझं सांगणं. भाईजी, आम्हांला या कामीं मदत करतांना तुमची सद्सद्विवेक बुध्दि जर मोठं बंड पुकारीत असेल, व तुम्ही अस्वस्थ होणार असाल, तर मदत देऊं नका. मागणं हें आमचं काम. तुम्ही माझ्यावर प्रेम करतां, म्हणून तुमच्याजवळ मागितले.”

“परंतु तुझं नाहीं ना माझ्यावर प्रेम ?”

“माझं प्रथम ध्येयावर प्रेम. मग तुमच्यावर, इतरांवर.”

“विश्वास, माझं ध्येय अद्याप मला मिळालं नाहीं. परंतु कुठं तरी खूप प्रेम करावं व तदर्थ सर्वस्व द्यावं असं मला वाटत असतं. मी प्रेमाची पाणपोई घालून बसलों आहें. कोणी माझ्याजवळ येतात, क्षणभर राहतात, पाणी पितात, निघून जातात. माझ्याजवळ कायमचं राहावं असं कोणालाहि वाटलं नाहीं. असा कोणी मिळेल का मला ? माझ्या प्रेमाची तहान ज्याला सदैव लागेल, असा भेटेल का कोणी मला ? हा जणूं माझा प्रयोग आहे. जाऊं दे. विश्वास, फार विचार केला तर सारं शून्यच वाटूं लागतं. मी देईन पैसे; परंतु विश्वास, असा कठोर भावनांचा कसा रे तूं ? हृदयांतून का सा-या भावना, कोमल भावना फाडून फाडून तूं फेकून दिल्या आहेस ?”

“भाईजी, हा विश्वास जीवनांतील सौंदर्याचा उपासक आहे. परंतु आज सभोवतालचं सारं जीवन विफल झालं आहे. कलाहीन झालं आहे. भावनांच्या जीवनांतील सुंदरता प्रकट व्हायला आज अवसरच नाहीं. फुलं पाहायला वेळ नाहीं, पांखरांची किलबिल ऐकायला मन धजत नाहीं, घरांत पोर थंडींत उघडीं असतां पांखरांची किलबिल कोणाला मोहील ? जीवनांतील सारी कुरूपता, सारा हिडिसपणा, सारी क्रूरता आज समोर सर्वत्र उसळून राहिली आहे. सौंदर्याला प्रकट व्हायला वेळच नाहीं. कोमल भावनांच्या विकासाला आज अवसरच नाहीं. मी सौंदर्योपासक आहें. कोमल भावनांचा उपासक आहें, म्हणूनच आज मी कठोर झालों आहें. काय सांगूं भाईजी, मला नीट सांगतांहि येत नाहीं.”

“विश्वास, चल जाऊं. माझ्या प्रेमाचा दिवा आज जो रस्ता मला दाखवील, त्यानं मला जाऊं दे. हें प्रेम का आसक्ति ? मला समजत नाहीं. तुम्हांला निराश व हताश करणं म्हणजे मरण वाटतं. माझं प्रेम म्हणत आहे, “दे पैसे.” मी देईन.”

“भाईजी, तुमच्या या प्रेमाला अनंत प्रणाम.”

भाईजी व विश्वास घरीं आले. कल्याण नि संध्या स्वयंपाक करीत होतीं. कल्याण पोळया भाजत होता; संध्या लाटून देत होती. तें दृश्य पाहून भाईजींना परम आनंद झाला.

“पतिपत्नींचा प्रेमळ सहकार ही एक अति मधुर व पवित्र गोष्ट आहे.” ते म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel