“विश्वास, कां शिव्या देतोस ? त्यानं कांहीं होणार का आहे ? कांहीं व्हायचं असेल, तर शेतकरी-कामकरीच करतील. या सुशिक्षित नोकरीवाल्यांची नेहमीं सरकारच्या चरणांकडेच दृष्टि असायची. आम्हां पांढरपेशांना नेहमीं हाच उद्योग. मुसलमान आले. आम्ही फारशी शिकून त्यांचे कारकून होऊन त्यांचीं राज्यं चालविलीं. इंग्रज आले. ताबडतोब इंग्रजींत तरबेज होऊन त्यांचा गाडा चालवूं लागलों. आणि आतां हिटलर येईल असं वाटून पांढरपेशे तरुण जर्मन भाषा शिकूं लागले. कॉलेजांतून जर्मन भाषा घेणा-यांची यंदा म्हणे गर्दीच गर्दी ! अशा पांढरपेशांवर ते तपस्वी, महर्षि इतिहाससंशोधक राजवाडे नुसते जळफळत. पांढरपेशांचा लोंचट वर्ग असं ते म्हणत. विश्वास, म्हणून यांची आशा सोडा. तुमचं लक्ष शेतक-या-कामक-यांकडे आहे. तेंच योग्य. रागावूं नकोस. उद्यां मिळेल घर तिथं घ्या. माझा प्रयोग बंद करा. पुण्याच्या पांढरपेशांचं स्वरूप कळलं ना ? त्यांचं अंतरंग कळलं ना ? पुष्कळ झालं------” भाईजी म्हणाले.
“भाईजी, मी संध्येकडे जातों. भात झाला आहे ना ?” कल्याणने विचारलें.
“हो, झाला आहे. तूप घाल हो जरा बरंचसं. मेतकुटहि ने हवं तर पुडी करून.” भाईजी म्हणाले.
कल्याण भात घेऊन गेला. विश्वास झोंपला. भाईजी कांहीं लिहीत बसले. सायंकाळीं हरणी आली. संध्येला भेटून ती आली होती.
“भाईजी, विश्वास उगीचच निजला आहे ना ?” तिनें विचारलें.
“उन्हांतून नवीन जागा पाहायला गेले होते.”
“कां ?”
“ही जागाहि सोडायची. मालकानं जा म्हणून सांगितलं. पुन्हां सामानाची मिरवणूक.”
“हा काय त्रास ?”
“ही गुलामगिरी हो, हरणे. हिंदुस्थानांत माणसं नाहींत. मेंढरं आहेत.”
“उठवूं का विश्वासला ?”
“उठव आतां. दिवे लागायची वेळ होईल. या वेळीं झोंपणं बरं नाहीं. पडसं होतं, सर्दी होते.” भाईजी म्हणाले.
“विश्वास, अरे विश्वास !” हरणीनें हलवून हांका मारल्या.
“निजूं दे ग मला.” तो कुशीवर वळून म्हणाला.
“ऊठ रे, आपण फिरायला जाऊं.”
“हरणें, हिंडून हिंडून दमलों; पाय दुखायला लागले.”
“चेपूं का जरा ?”
“नको. तूं संध्येकडे जाऊन आलीस का ?”
“हो, आलें.”
“कशी आहे ?”
“बरी आहे. मधूनमधून तिचे डोळे अजून ओले होतातच. परंतु आतां बरीच शांत झाली आहे.”
“हरणे ?”
“काय, विश्वास ?”
“चल, जाऊं फिरायला.”
“पण थकला ना आहेस ?”
“फिरल्यानं, तुझ्याबरोबर फिरल्यानं थकवा जाईल; चल; भाईजी, येऊं जरा फिरून ?”
“ये. मनमोकळेपणं बोला. जरा आनंदी होऊन ये.”