“कल्याण, ही मिरवणूक शांतपणं पार पडेल असं मला वाटत नाहीं.”

“कां बरं ? मिरवणुकींत आपापल्या झेंडयाचे कोणी जयजयकार करायचे नाहींत असं ठरल्याचं इथं लिहिलेलं आहे. निश्चित अशा घोषणांचाच घोष करण्यांत येणार. आणि सेनापतींसारखी थोर विभूति तिथं असल्यावर वेडंवांकडं वर्तन कोण करील ?”

“तूं कांहीं म्हण, मला तर दंग्याचीभीति वाटते.”

“विश्वास,या मिरवणुकींत भाग घेण्यासाठीं मीहि उद्यां इथं राहीन म्हणतों. लाल झेंडयाखालीं मी उभा राहीन.”

“नको. तूं इथं राहूं नको. तूं घरीं जा. संध्याराणी वाट बघत असेल. उद्यां मारामारी होईल. तुझ्यानं स्वस्थ राहावणार नाहीं.

तूंहि घुसशील. बरंवाईट झालं तर ?”

“मारामारी होणार असेल तर मीं राहिलंच पाहिजे. कातडी वांचवून काय होणार ? जखमी नवरदेव संध्येला अधिकच आवडेल.”

विश्वासनें कितीहि सांगितलें तरी कल्याण गेला नाहीं. तो राहिला. आणि दुस-या दिवशींच्या त्या मिरवणुकींत तो सामील झाला. ते पाहा तीन प्रकारचे झेंडे ! तो पाहा भगवा झेंडा, तो पाहा लाल झेंडा आणि तो सर्वांचें ऐक्य करूं पाहणारा थोर तिरंगी झेंडा ! तपस्वी सेनापतींच्या हातांत नवभारताची ती दिव्य पताका होती. चरख्याचें चिन्ह असलेली नव-राष्ट्रध्वजा ! त्या तिरंगी झेंडयानें दरिद्री जनतेला हृदयाशीं धरलें आहे, असा नाहीं का त्या खुणेचा अर्थ ?

शांतपणें मिरवणूक चालली. परंतु लकडी पुलाजवळ कांही तरी भानगड झाली. भगव्या झेंडयाचा म्हणे कोणी तरी जयजयकार केला ! मग इतर झेंडयाचेहि सुरू झाले. “फाडा तो तिरंगी झेंडा” कोणी गर्जले. मारामारी सुरू झाली. सेनापतींच्या हातातील तिरंगी झेंडा एका शूर मुलीच्या हातांत होता. तिच्या हातांतून तो झेंडा हिसकवून घेऊ लागले. परंतु ती कोमल मुलगी वज्राच्या निश्चयाची होती. तिची सुकुमार मूठ जणूं पोलादी होती. त्या निर्भय मुलीवर हल्ला झाला. ती भारतकन्या मर्ूच्छित पडली. तेथें सेनापति धांवून आले. आणि त्यांच्यावरहि घाव पडले ! महाराष्ट्राच्या शौर्यधैर्याची, त्यागतपस्येची ती पवित्र मूर्ति ! राष्ट्रांत ऐक्य व्हावें म्हणून तळमळणारी ती वंदनीय विभूति ! त्या पवित्र शरीरावर का प्रकार व्हावा ?

मिरवणूक मोडली. सेनापतींना उचलून नेण्यांत आलें. त्या शूर मुलीला उचलून नेण्यांत आलें. आणि कल्याण कोठें आहे ? तो पाहा रक्तबंबाळ   कल्याण ! आपलें रक्त पुशीत तो जात आहे. त्याच्या कपाळावर जोराचा तडाखा बसला होता. महाराष्ट्राच्या पुण्य मूर्तीला वांचविण्यासाठीं तोहि धांवून गेला होता. अभिमन्यूप्रमाणें त्या गर्दीत घुसून तो घाव झेलीत होता.

कल्याणची जखम बांधण्यांत आली. तो शांतपणें पडून होता. परंतु त्याचें डोकें अशांत होतें. विचारांचें वादळ डोक्यांत उठलें होतें. तो अस्वस्थ झाला होता. महर्षीच्या पुण्यपावन देहावरहि घाव घातले जावेत, याची त्याला चीड आली होती. परंतु हल्ला करणा-यांची शेवटीं तो कींव करूं लागला. त्यांच्या अज्ञानाचें, संकुचितपणाचें त्याला वाईट वाटलें. तो शेवटीं विश्वासला म्हणाला,

“विश्वास, सेनापतीसारख्यांवर हल्ला करणा-या तरुणांची वृत्तिच मी समजूं शकत नाहीं. अशा पुण्यात्म्यावर हल्ला करणारे-त्यांना माणसं म्हणूं कीं माकडं ? आपल्या देशांतील तरुणांत ही फॅसिस्टी वृत्तिच बळावणार का ? उगींच मारामारी करणं, कारण नसतां कुरापत काढून दंगल माजवणं, यामध्येंच का कांहीं तरुणांना पुरुषार्थ वाटणार ? उदार भावनांचे तरुण अशा संकुचित संघटनांत शिरून माणुसकीला का पारखे होणार ? कीं यांच्यांतहि पुढं विवेक येईल, मोठी नवयुग-दृष्टि येईल ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel