तो मनुष्य निघून गेला. कल्याणनें डबा सोडला व उघडला. त्यांत लाडू होते. आणि लाडूहूनहि गोड अशी एक वस्तु म्हणजे पत्र होतें.
“कल्याण, पत्र मग वाच. आधीं लाडवांचा समाचार घेऊं. ऐन वेळीं लाडू आले.” विश्वास म्हणाला.
“बरं, आधीं लाडू खाऊं.” कल्याणनें त्या गोड कार्यक्रमाला संमति दिली. दोघांनीं निम्म्या लाडवांचा चट्टामट्टा केला.
“आतां चार दिवस जेवण नाहीं मिळालें तरी चालेल.” विश्वास म्हणाला.
“रेड इंडियन लोक तंबाकूची गोळी तोंडांत ठेवून आठ आठ दिवस अन्नाशिवाय लढत असत.”
“तूं लाडवाचा तुकडा ठेवणार आहेस कीं काय तोंडांत ?”
“ठेवला असता; परंतु तो टिकणार नाहीं.”
“कल्याण, मी आतां निजतों. तूं तें पत्र वाच. कारण तें संपायला हवं. कंदिलांत तेल आहे थोडं. तुझं पत्र वाचून संपेल कीं नाहीं याची शंकाच आहे.”
“विश्वास, अरे हें पत्र काळोखांतसुध्दां वाचतां येईल. हें पत्र वाचायचं नसतं. हातांत धरायचं असतं. हृदयाशीं धरायचं असतं.”
“कल्याण, तूं लग्न करणार ना नव्हतास ?”
“नक्की कांहीं नाहीं. परंतु संध्येची मला आठवण येते. आम्ही दोघं उपाशींहि आनंदानं राहूं. आज आपण उपाशीं होतों. संध्या आलीच कांहीं तरी गोड घेऊन. संध्या म्हणजे आनंद, समाधान. संध्या म्हणजे धीर व आशा.”
“कल्याण, उद्यांपासून आपण कल्हई लावायचं काम करूं. कांहीं तरी करायला हवं बुवा. तुला कल्हई लावायला येते. मलाहि येईल. मी “कल्हई लावायच्ये का कल्होई” असं ओरडून भांडीं गोळा करून आणीन. तूं भाता वगैरे जमीन खणून लावून ठेव. करायचा का प्रयोग ? मॅट्रिकच्या विद्यार्थ्याना पत्रकं वांटलीं. आतां कल्हईवाले होऊं या. विद्यार्थ्यांचीं मनं उजळ करूं पाहात होतों. आतां भांडयांचीं तोंडं व अंतरंगं उजळ करूं या. तुझ्या संध्येला काय वाटेल ? कल्हईवाल्याशीं लावील का ती विवाह ?”
“अरे, ती आपणांबरोबर ओरडायलासुध्दां येईल. मी कुठंहि गेलों व कांहींहि केलं, तरी संध्याराणी बरोबर येईल.”
“बरं, बघूं.”