कल्याण आपल्या खोलींत गेला व त्या खिडकीशीं बसला. भीमेचा रम्य प्रवाह त्या खिडकींतून दिसत होता. तो सारखा त्या खिडकीकडे पाहात होता. त्याला तेथें स्वत:च्या जीवनाचा प्रवाह का दिसत होता ? भीमा पुढें कृष्णेला मिळाली. त्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या प्रवाहाला कोणते प्रवाह उद्यां     मिळणार ? या कल्याणचा जीवनप्रवाह असाच राहील कीं विशाल होईल ? पुण्याला गेल्यावर कोण भेटणार, कोण नवीन मित्र मिळणार ? पुण्याला आपले कसे होणार ? कोणते अनुभव येणार ? असे का त्याच्या मनांत विचार येत होते ?

त्यानें आपली ट्रंक उघडली. सुगंध आला. सौम्य गोड सुगंध. वाळलेल्या फुलांचा सुगंध. काय बरे त्या मुलीचे नांव ? माझे नांव तिला माहीत आहे. परंतु मला तिचे नांव माहीत नाहीं. मी विचारलें होते का तिला नाव ? काय बरे तिचे नाव ? मला तिनें हार दिला. का दिला ? सहजपणे दिला ? पूर्वजन्मींचे का ऋणानुबंध आहेत ? हा का पूर्वजन्मींचा सुगंध ? सोळासतरा वर्षांचा कल्याण खोल पाहूं लागला. त्याने डोळे मिटले. पुन्हा डोळे उघडून त्या नदीकडे तो पाहूं लागला.

शुक्रवारीं दुपारीं कल्याण आईला म्हणाला.

“आई, मी शेजारच्या उडगी गांवी जाऊन येतो. तिथं एका मित्राला मला भेटायचं आहे. सायंकाळी परत येईन.”

“लौकर ये. रात्र करूं नको. आज चांदण नाहीं हो.”

“आई, माझ्या मनांत सदैव चांदणंच असतं.”

“शेवटपर्यंत असच राहो. अंवसेचा अंधार कधीं न येवो.”

कल्याण उडगी गांवी जायला निघाला. त्यानं दुस-या कोणालाहि सांगितले नाहीं. त्याच्या अंगांत पहिलवानी पेशाचा पातळ सदरा होता. हातांत जाड सोटा होता. प्रेमळ पहिलवान गांवाच्या बाहेर पडला. किती तरी विचार त्याच्या मनांत येत होते. तो जिच्यासाठीं जात होता, तिचे नांव त्याला माहीत नव्हतें. तिचे घर त्याला माहीत नव्हतें. प्रेम आपल्याला रस्ता दाखवील या आशेनें जणूं तो जात होता. खरी उत्कट इच्छा असली तर ती सफल होते, या श्रध्देने तो जात होता. कोठे तरी ती दिसेल. ती नसेल का आपली वाट पाहात ? कशी हंसे ! किती गोड ! आणि पुन्हा कशी धीटपणे बोले.

कल्याण त्या उडगी गांवांत आला. तो निरनिराळया गल्ल्यांतून व रस्त्यांतून हिंडत होता. कांही ओळखीचीं मुलें त्याला भेटलीं. परंतु त्याचें लक्ष त्यांच्याकडे नव्हते. त्या मुलीविषयी तो त्यांना काय विचारणार ? त्याला धैर्य झालें नाहीं. तो निरनिराळया मोठमोठया घरांकडे पाही. परंतु इच्छित वस्तु त्याला कोठेहि दिसली नाहीं. शेवटी उडगी गांवांतील ओळखीच्या मुलांचा निरोप घेऊन तो गांवाबाहेर पडला. कोठें तरी तो जाऊं लागला. त्याचे चित्त ठिकाणावर नव्हते. शेवटी एका झाडाखाली तो बसला. त्याला झोंप येऊ लागली. झाडाच्या बुंध्यावर डोकें ठेवून तो निजला. झोपेंत त्याला स्वप्न दिसलें, स्वप्नांत त्याला ती मुलगी दिसली. तो गोड हंसला व हळूच त्यानें डोळे उघडले. तो समोर खरोखरच ती मुलगी. हे स्वप्न का सत्यदर्शन ? कल्याण बघतच राहिला !

“किती जाड व जड ही तुमची काठी ?”

“तुम्ही ती कशाला उचललीत ?”

“तुमची म्हणून.”

“मला तुम्ही ओळखलंत ?”

“विजयी वीराला कोण नाही ओळखणार ? त्याला सार जग ओळखतं. तो मात्र जगाला ओळखत नाहीं. “

“मी या गांवी कां आलों ?”

“असेल कांही काम.”

“कोणतं बरं ?”

“कवाइतीचं.”

“नव्हे.”

“मग कोणतं ?”

“ओळखा; सांगा.”

“मला काय माहीत ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel