७
घरीं
संध्येनें कल्याणला तुरुंगांत पत्र पाठविलें होते. त्या पत्रांत तिनें त्याच्या घरची सारी हकीगत लिहिली होती. आईची मन:स्थिति, रंगाची मन:स्थिती तिनें वर्णिली होती. कल्याणनें घरीं यावें म्हणून तिने ते सारे लिहिलें होतें. कल्याण घरीं आला म्हणजे उडगी गांवीं तिलाहि भेटायला आल्याशिवाय कसा राहील ? त्या पत्रांत तिनें स्वत:विषयीं कांहीं लिहिले होते का ? तिनें इतर सर्वांच्या सुखदु:खाची स्थिति लिहिली. परंतु स्वत:चे सुखदु:ख ? तिनें स्वत:विषयीं एक ओळहि लिहिली नाहीं. स्वत:च्या भावना तिने प्रकट केल्या नाहीत. स्वत:विषयींच्या मौनानेच स्वत:चें अनंत हृदय जणूं तिने कल्याणला कळविलें. तें मौन सूचक होते, अति वक्तृत्वपूर्ण होतें.
कल्याणला तें पत्र मिळालें. त्यानें ते वाचलें. वाचून तो दु:खी झाला. आतांपर्यंत तो नवविचारांत होता. कल्पासृष्टींत होता. भविष्यकालीन श्रमजीवींच्या राज्यांत होता. कामगारांच्या क्रांतीचीं त्याला स्वप्नें पडत होतीं. पुष्कळ वेळां असें होते. आपण विश्वाचा विचार करीत बसतों व समोर असलेलें लहान कर्तव्य आपण विसरतों. मोठया गोष्टींच्या पाठीला लागून लहानहि गमावून बसतों; आणि मोठं मिळत नाहीं तें नाहीं. याचा अर्थ मोठीं ध्येये डोळयांसमोर नसावींत, त्यांच्यासाठीं धडपड नसावी असा नाहीं. परंतु शक्य तों लहान कर्तव्यांची हि उपेक्षा करूं नये.
स्वत:च्या आईचा कल्याणला विसर पडला होता. परंतु आतां तो विचार दुप्पट जोरानें आला. आईची मानहानि वाचून त्याचे डोळे लाल झाले. केव्हां एकदां घरीं जाईन असें त्याला झाले. बाबांना बोलेन, त्या बाजारबसवीला घरांतून बाहेर काढीन असे विचार त्याच्या मनांत येत होते. तो आपले दिवस मोजूं लागला. स्वत:च्या सुटकेची तारीख पाहूं लागला.
आणि एके दिवशीं तो सुटला. तो पुण्याला आला. विश्वासला भेटायला गेला. विश्वास कॉलेजांत शिकत होता. त्याचा तो जामानिमा पाहून कल्याण चकितच झाला !
“एकूण तुझे वडील तुझ्यावर खूष आहेत ?”
“हो. कॉलेजमध्यें जाणा-या स्वत:च्या मुलाचा त्यांना आतां अभिमान वाटतो. मीं इतर कांहीं वेडे ढंग करूं नये एवढंच त्यांचं म्हणणं. मीं हल्लीं सारं सोडून दिलं आहे. खा, पी, गा, चैन कर, हा माझा कार्यक्रम. कशाला हवी जगाची चिंता ? उगीच काल्पनिक ध्येय निर्माण करायचीं व त्यांची चिंता उरावर बसवून घ्यायची ? कोणीं सांगितलं आहे ? मैंने सब कुछ छोड दिया है. हॉटेलमध्यें जावं, रात्रीं बोलपट बघावा, मजा करावी.”
“विश्वास, काय हें बोलतोस ?”
“माझ्या मनांत आहे ते मी बोलतो. लपंडाव काय कामाचां ?”
“विश्वास, मीं तुरुंगांत पुष्कळ वाचलं. पुष्कळ ऐकलं. क्रांतीचा खंदा शिपाई व्हायचं मीं ठरवलं. क्रांतीसाठीं कामगार उठाव करीत आहेत, रस्त्यारस्त्यांतून लढत आहेत. त्यांच्या झेंडयाखालीं मी लढत आहें. माझ्या रक्तानं मी लाल झेंडा रंगवीत आहें; अशीं स्वप्नं मी रंगवीत असतो. तीं स्वप्नं सत्यसृष्टींत आणायची मला तळमळ आहे. आणि विश्वास, तूं कुठं चाललास वाहावत ? तूं का केवळ सुखासीन होणार ? डोळयांवर पडदा ओढून बसणार ? नाहीं, असं नाहीं होणार. हें धुकं जाईल. पुन्हां तूं उभा राहशील, गरिबांसाठीं उभा राहशील. आपण दोघे मित्र एकाच ध्येयाची पूजा करूं. विश्वास, तूं कॉलेजांत शिकत आहेस, हॉटेलांत शिरा-पुरी खात आहेस, बोलपट बघत आहेस; परंतु ही परिस्थिति कितींना आहे ? कोटयवधि लोकांना पोटंभर खायलाहि नाहीं. दुस-यांचा विचारच तुझ्याजवळ उरला नाहीं का ? श्रमणा-यांच्या जीवनाच्या होळया तुला का दिसतनाशा झाल्या ?”