“हरणे, किती ग दिवस झाले त्यांच्या अन्नसत्याग्रहाला ?”
“तुला कळलं वाटतं ? आजचा आठवा दिवस.”
“आठ दिवस का विश्वास, कल्याण, बाळ वगैरे उपाशी आहेत ?” असें म्हणून संध्येनें चमत्कारिकपणें पाहिलें. ती एकदम उठून बसली. ती वातांत गेली. ती ताडकन् उभी राहिली. हरणी तिला आंवरीत होती. “सोड मला, तूं कोण मला अटक करणार ? मी क्रान्ति करणार ! आगडोंब पेटवणार ! कोण तूं ? भांडवलदार आहेस ? तुला दूर झुगारून क्रांतीचा बावटा फडकवीन ! कोण तूं ? साम्राज्यशाहीचा पोलीस ? तुला अशी ढकलून निघून जाईन-” संध्या त्वेषानें हातवारे करीत बोलत होती. हरणीनें मोठया मुष्किलीनें तिला आंवरलें. तिच्या डोळयांतून पाणीहि येत होते. तिनें संध्येला अंथरुणावर पुन्हां निजविलें. डोळे मिटून संध्या पडून राहिली. तिचें लक्षण ठीक दिसेना. मध्येच वात होई. मध्येंच थोडी शुध्द येई. हरणी मोसंब्याचा रस देत होती.
“नको ग मेला तो रस. ते तिकडे उपाशी मरत आहेत नि मी का रस पीत बसूं ? “ती म्हणाली.
“संध्ये, असं काय बरं ? थोडासा तरी घे.” हरणी म्हणाली.
“तुला वाईट वाटलं, हरणे ? ओत तोंडात. हा बघ आ केला.” हरणीने थोडा रस तोंडांत घातला. असे दिवस जात होते. आणि एके दिवशी अकस्मात् भाईजी आले. हरणीला बरें वाटलें. रंगाला धीर आला. भाईंजी आले ते संध्येच्या जवळ बसले. तिच्या डोक्यावर हात ठेवून डोळे मिटून ते बसले होते.
“कोण आहे माझ्याजवळ ? कोण हें ? इथं काय बसता ? इथं कुणी नका राहूं ? जा सारे; बाहेर पडा; चळवळ करा; तुरुंग भरा. रान उठवा; पेटवा वणवा.” असे म्हणून संध्येनें भाईजींना ढकलले. ते तिला शांत करीत होते. तिनें एकदम पाणी मागितलें. त्यांनीं तिच्या तोंडांत पाणी घातलें. स्थिर दृष्टीनें तिनें त्यांच्याकडे पाहिलें; आणि एकदम ओळखून म्हणाली :
“भाईजी, माझे भाईजी !” त्यांच्या मांडीवर तिने डोकें ठेवले. निमूटपणें ती पडून होती. थोडया वेळानें म्हणाली :
“भाईजी, मला बरं करण्यासाठीं आलेत ? होय ना ? उगीच आलेत. ते तिकडे तुरुंगांत अन्नसत्याग्रह करीत आहेत. आणि आपण का भाईजी जगावं ? मला मरण येऊं दे, भाईजी.”
“संध्ये, तूं पडून राहा. केवळ मरण एवढंच ध्येय नाहीं. योग्य वेळीं विचारपूर्वक मरावं. बलिदान हीहि एक पवित्र गोष्ट आहे. ती केरकचरा नाही. शांत राहा. बरी हो. तूं बरी बाहेस असं कळलं, तर त्या उपवासांतहि कल्याणला तुरुंगांत जणूं अन्न मिळाल्यासारखं वाटेल.”
“तुम्ही का माझ्या आजारीपणाचं त्याला कळवलं आहे ?”
“हो.”
“कां कळवलंत ?”
“तें कर्तव्य वाटलं म्हणून.”
“सरकारकडे अर्ज करायला नाहीं ना सांगितलंत ?”
“सांगितलं आहे. बिनशर्त सोडणार असतील तरच.”
“कशाला अर्ज ?”