“बेडी के झनझन में वीणा की लय हो
जय हो विजय हो
भारत जननि तेरी, जय हो विजय हो”

लो.टिळक म्हणाले होते कीं, “माझ्या तुरुंगवासांतील कष्टानंच माझे कार्य वाढेल. आपल्या पुढा-यांच्या तुरुंगवासानं आपलंहि कार्य वाढो. धार उंच असली, दूर असली, तरी तिथून ती पिलांकडे पाहते. तिच्या दृष्टींतूनच पिलांना चारा मिळतो, पोषण मिळतं. त्याप्रमाणं आपले पुढारी जरी कुठं अंदमानांत नेऊन ठेवले, तरी त्यांची दृष्टि आपल्याकडे, आपल्या युनियनकडे असेल. त्यानं आपलं युनियन वाढेल, पुष्ट होईल, खरं ना ? ज्ञान मिळवा; वर्गयुध्दाचं ज्ञान मिळवा. आजपर्यंत पिळवणूक होत आली. परंतु मोक्षाची वेळ जवळ येत आहे. ग्रहण सुटूं लागलं आहे. १८७१ मध्यें पॅरिस शहरांतील कामगारांनीं तीन महिने राज्य केलं. त्या तीन महिन्यांतच त्यांनीं केवढी नवीन दृष्टि दाखवली होती ! समाजरचनेच्या नवनिर्मितीचं दर्शन त्यांनीं घडवलं होतं. परंतु ती सत्ता नष्ट करण्यांत आली. कामगारांच्या पुढा-यांना भिंतीसमोर उभे करून गोळया घालण्यांत आल्या. त्या क्रांतींत नाना धंद्यांतील कामगार होते. एक कामगार सेनापति विटा भाजणारा होता. एक न्हावी होता. त्यांचा उपहास करून गोळया घातल्या गेल्या. “विटा भाजणारा, राज्य करूं पाहतो बेटा; घाला गोळी” असं म्हणून गोळी घातली. त्यांना काय माहीत कीं, ५० वर्षांच्या आंतच रशियांतील कामगार एक महान् श्रमजीवि सरकार स्थापन करतील ? परंतु आज कामगारांसमोर तो लाल आदर्श आहे. त्या ध्येयाकडे जगांतील सारे कामगार जातील. आपणांस कष्ट पडतील. आगींतून जावं लागेल. परंतु आगींतून गेल्यावरच वीट पक्की होते व मग तिच्यामुळं टोलेजंग इमारत उठते. कामगारभाईहो, संघटना, ज्ञान, एकजूट हीं आपलीं ब्रीदवाक्यं. एक लाल झेंडा हें आपलं दैवत. हा लाल झेंडा फडफडत असला म्हणजे आजपर्यंत कामगारचळवळींत जे जे जगभर मेले, त्यांचीं हृदयं तडफडत आहेत, असं वाटतं. त्यांचे आत्मे तुम्हांला पेटवण्यासाठीं वारा घालीत आहेत, असं वाटतं. या लाल झेंडयांत सारे पुढारी आहेत. सारं बलिदान आहे. त्याच्याखालीं या व इन्किलाबची, कामगारक्रान्तीची घोषणा करा.” कल्याण किती तरी बोलत राहिला. त्याला बोलूंहि देण्यांत आलें. त्याच्या भाषणाचें सर्वांना आश्चर्य वाटलें. सर्वांनी त्या भाषणाची प्रशंसा केली. सभा प्रचंड जयघोषांत, पुढा-यांच्या जयघोषांत संपली.

“कल्याण, तूं आज किती सुंदर बोललास !” विश्वास म्हणाला.

“ते आज बाहेर असते, तर तुमची पाठ थोपटते” त्या थोर पुढा-याची पत्नी म्हणाली.

“परंतु ते बाहेर असते, तर मी बोललोंच नसतों.” कल्याण म्हणाला.

मंडळी घरीं आली. कल्याण व विश्वास नित्याप्रमाणें गॅलरीत पथा-या पसरून पडले. विश्वास लौकरच घोरूं लागला. परंतु कल्याणला झोंप येईना. तो कठडयाशीं उभा होता. ट्रॅमची घरघर थांबली होती. म्युनिसिपालिटीचे दिवे आकाशांतील ता-याप्रमाणें शांतपणें पहारा करीत होते. सारी मुंबई शांत होती. रस्त्यांवरील झाडें मूर्तीप्रमाणें शांतपणें उभीं होतीं. परंतु कल्याण अशांत होता. आकाश शांत होते. पृथ्वी शांत होती. वारे शांत होते. परंतु कल्याण अशांत होता. तो सुस्कारे सोडीत होता. कसला करीत होता तो विचार ?

आणि विश्वासला एकदम जाग आली. त्याने कल्याण उभा आहे असें पाहिलें.

“काय रे कल्याण, झोंप नाहीं का येत ?”

“नाहीं.”

“कां बरं ?”

“आज मला एकदम आठवणी आल्या. आईच्या, रंगाच्या, संध्येच्या, सर्वांच्या आठवणी. हृदयसागर उसळला आहे. विश्वास, इकडे आपण कामांत दंग आहोंत. दिवस कसा जातों तें कळतहि नाहीं. परंतु तिकडे आईची काय दशा असेल ? बाबा पुन्हां तिला छळीत असतील का ? आई रडत असेल का ? रंगा अगतिक होऊन निराशेनं बसला असेल का ? आणि प्रेमळ, आशामयी, स्नेहमयी संध्या. विश्वास, काय करावं समजत नाहीं. कशाला या अशा ओळखी होतात ? हृदयाला पिळवटणा-या ओळखी. आज माझं भाषण चांगलं झालं असं तुम्ही सारे म्हणालेत. मग संध्येला किती आवडलं असतं ते ! तिला किती आनंद झाला असता ! तिने माझी प्रेमपूजा केली असती. संध्या दूर आहे. म्हटलं तर ती जवळहि आहे. परंतु हें समाधान काय कामाचं ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel