“प्रेमानं गुलाम होण्यांत तुम्हांला मोक्ष मिळतो ना ? संध्ये, हे काय म्हणत होते ? यांना जाऊं देऊं नकोस. नाहीं तर निमूटपणं निघून जातील व मागून पत्र पाठवतील कीं मला राहणं अशक्य झालं म्हणून निघून गेलों. तुझं ते ऐकतील.”
“परंतु ते एका अटीवर इथं राहणार.”
“कोणत्या ?”
“म्हणतात, मीं मला स्वयंपाक करूं दिला पाहिजे.”
“भाईजी, तुम्ही पुरुष कशाला झालेत ?”
“स्वयंपाक पुरुषांनीं करूं नये असं तुझ्या मार्क्सवादांत आहे वाटतं ? शास्त्रीय विरोधविकासवादांत आहे वाटतं ?”
“भाईजी, तुम्ही मार्क्सवादाबद्दल असं उपहासानं नेमकीं कां बोलतां ? होय, आमचा शास्त्रीय समाजसत्तावाद शास्त्रीय विरोधविकासवाद आहे, शास्त्रीय ऐतिहासिक भौतिकवाद आहे; आमचा सदैव शास्त्रीयच दृष्टिकोण असतो. भोळसटपणा हें आमचं ब्रीद नव्हे. समाजाच्या गतीचे आम्ही नियम शोधून काढतों. त्यावरून पुढील अनुमानं काढतों. शास्त्रावर आमची श्रध्दा आहे.”
“आणि शस्त्रावर, हिंसेंवरसुध्दां ?”
“होय; क्रान्ति करण्यासाठीं शस्त्रहि आम्ही हातीं धरूं, समजलं ? तुम्ही भरा बांगडया.”
“बांगडया भरणारे हात विश्वास, दुबळे नसतात. स्त्रियांविषयीं नकळत तुमच्या तोंडून पाहा कसे अनुदार उद्गार बाहेर पडतात ते. आणि शस्त्र हातीं न घेणारा तो भ्याडच असतो असं नाहीं. दुष्टाच्या शस्त्रासमोर निर्भयपणं उभा राहणारा तो का भ्याड ?
“चलाव तेरी गोली” असं म्हणून गुरख्यासमोर स्वत:ची विशाल छाती उघडी करणारे स्वामी श्रध्दानंद, ते का भीरु ?”
“वाद नकोत. भाईजी, तुम्ही राहणार कीं नाहीं तें सांगा. मला पुन्हां बाहेर जायचं आहे.”
“विश्वास, पुन्हां तुझी धांवपळ सुरू झाली. आजारी का पुन्हां पडायचं आहे ? जरा जपून वाग.”
“तुम्ही यासाठींच तर इथं राहा आमची जरा काळजी घ्यायला. “जपून वागा” असं सांगायला.”
“मग स्वयंपाक मी करीत जाऊं ना ?”
“संध्ये, दे यांच्या हातांत चूल. होऊं दे त्यांचं समाधान. भाईजींच्या मनाचा कोंडमारा नको. करा हं स्वयंपाक, नीट करा. तुमचा आत्मा त्यांत ओता.”
“माझ्या आत्म्याची टिंगल तुम्हांला चालते ना ?”
“ही टिंगल का ? म्हटलं आत्मा ओता व मोक्ष मिळवा.”
“होय, मिळवीन. तीच माझी धडपड आहे.”
विश्वास पुन्हां बाहेर गेला. आणि त्या दिवशीं सायंकाळपासून भाईजी स्वयंपाक करूं लागले. संध्या अंथरुणावर पडून राही. कांहीं वाची. भाईजींना थोडी मदत करी. गप्पागोष्टी करी. दिवस आनंदांत जात होते. भाईजी दुपारीं वाचीत. समाजवादावरचीं पुस्तकें वाचीत. विश्वास निरनिराळीं पुस्तकें त्यांना आणून देई.
“तुम्हांला मी दोन पुस्तकं देईन. त्यांचा मराठी अनुवाद करा, भाईजी. तुम्ही छान कराल. तुमचं भाषांतर भाषांतर असं वाटत नाही. आमचं भाषांतर बोजड होतं. क्लिष्ट होतं. कराल का ?”
“तुझी इच्छा असेल तर ती पुरी नको का करायला ? माझा जो उपयोग करून घेतां येईल, तो करा.”
“परंतु तुम्ही तर चूल हातांत घेतां.”
“विश्वास, संध्येला सध्यां विश्रांति नको का ? तिचं हें पहिलं बाळंतपण. वास्तविक माहेरीं जाऊन आईजवळ लडिवाळपणानं व भरंवशानं राहण्याचे हे दिवस. म्हणून मी बसतों चुलीजवळ. तुम्हांला इतर कामं आहेत. मला काय आहे काम ? मी चुलीजवळ बसण्यांतच धन्यता मानतों. माझ्या आयुष्यांत हे हल्लींचे दिवस मी भाग्याचे मानीन. सार्थकी लागले हे दिवस असं समजेन. तूं दिलेल्या पुस्तकांचंहि भाषांतर करीन. इतर वेळ थोडा का असतो ?”