“विवेकानं हळूहळू गोंधळ कमी होईल. जीवनांत प्रसन्न शांति येईल.” भाईजी म्हणाले.

इतक्यांत ज्या आवाजासाठीं विश्वास जागत बसला होता, तो आवाज कानीं आला. “मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल” अशा पत्रविक्या मुलांच्या घोषणा कानांवर पडल्या. विश्वास लगबगीनें उठला व धांवतच गेला. तो रस्त्यावर गेला तों तो मुलगा दूर गेला होता. विश्वास रागावला. दुसरा केव्हां येतो याची तो वाट पाहात थांबला. आला, दुसरा एक आलां. विश्वासनें एक प्रत घेतली. तेथें बाहेरच म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या प्रकाशांत तो पाहूं लागला. परंतु नीट दिसेना. तो दिवा फोडावा असें त्याला वाटलें. शेवटीं तो वर आला. त्यानें बटन दाबलें. दिवा लावला. सारीच मंडळी उठली. हरिणीचें नांव होतें. विश्वासनें उडी मारली. टिचकी वाजविली. “पास झाली, झाली पास, ठीक !” असें तो कितीदां तरी म्हणाला.

“भाईजी, गूळ तरी वांटा.” संध्या म्हणाली.

“उद्यां आणूं पेढे !” भाईजी म्हणाले.

“हरिणीच उजाडत घेऊन येईल. उद्यां हरणीचे पेढे आणि दोन दिवशीं संध्येचे पेढे.” विश्वास म्हणाला.

“आणि मग तुझ्या लग्नाचे.” संध्या म्हणाली.

“भाईजी, आमच्या लग्नाला आतां राहिलं पाहिजे हो. ठरवूं आतां लौकरच. मुख्य अडचण दूर झाली.” विश्वास म्हणाला.

“अजून रात्र पुष्कळ आहे. निजूं या सारीं.” भाईजी म्हणाले.

सकाळीं तो मालक पुन्हां वर आला.

“केव्हां जाणार तुम्ही ?” त्यानें विचारलें.

“आज रात्रीं इथं झोंपणार नाहीं, समजलेत ! हा काय तुमचा त्रास ? आधीं नोटिस दिली होतीत वाटतं ? एकदम आपले येतां व केव्हां जातां विचारतां. कांहीं माणुसकी आहे कीं नाहीं ?” कल्याण रागानें म्हणाला.

“परंतु आम्हांला काय माहीत कीं तुम्ही राजद्रोही माणसं आहांत म्हणून. आम्हांला वाटलं कीं असाल साधीं माणसं.”

“मग काय आम्हांला शेवटं-शिंगं आहेत वाटतं ?” रंगा म्हणाला.

“हें पाहा, मला तुमच्याजवळ बोलतां येत नाहीं. मेहेरबानी करा व घर मोकळं करा.” मालक म्हणाला.

“आज रात्रीपर्यंत खालीं करतों हां. झोंपायला दुस-या बि-हाडीं जाऊं. झालं ना ?” भाईजी म्हणाले.

मालक गेला. आज आतां सामान त्या नवीन जागेंत न्यायचेंच असें ठरलें. रात्रीं न्यायचें ठरलें. अंधार पडल्यावर न्यायचें असें ठरलें. सकाळीं आठाच्या सुमारास हरिणी आली. ती आज नवें सुंदर पातळ नेसून आली होती. तिला तें किती खुलून दिसत होतें. तोंडावर आनंद उधळला होता. डोळे नाचत होते. आशेनें नाचत होते. आणि हातांत गोड पेढे होते. तिनें सर्वांना पेढे दिले.

“हरणे, आतां दुसरे पेढे केव्हां ?” संध्येनें विचारलें.

“विश्वासला विचारा. माझं काम मीं केलं. पास झालें. पुढचं तुम्ही ठरवा. मी काय सांगूं ?”

“परंतु तुझी आई काय म्हणेल ?” विश्वासनें विचारलें.

“मी सारं सोडायला तयार आहें.” हरिणी म्हणाली. हरिणी निघून गेली. दुपारचीं जेवणें झालीं. परंतु संध्येचें पोट फिरून दुखूं लागलें. तें राहीना. शेवटीं विश्वासनें टांगा आणला. कल्याण संध्येला घेऊन गेला. थोडया वेळानें सायकलवरून विश्वासहि गेला. भाईजी एकटेच घरांत होते. सारें सुखरूप पार पडो, अशी ते प्रार्थना करीत होते.

दिवे लागायची वेळ होत आली, तरी दवाखान्यांतून कांहीं निरोप येईना. कल्याणचा पत्ता नाहीं, विश्वासचाहि पत्ता नाहीं. दुकानांतून रंगा घरीं आला.

रंगा सायकलवरून दौडला तो दवाखान्यांत गेला. तों तेथें काय ? कल्याण व विश्वास बाहेर सचिंत उभे होते.

“काय रे दादा ?” त्यानें विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel