“कल्याण, हरिणी पास झाली तर नोकरी करणार आहे. मी अशी एखादी परीक्षा दिली असती तर ? परंतु मीं कोणतीच परीक्षा दिली नाहीं. संध्या निरुपयोगी आहे.”

“तूं प्रेमाची परीक्षा दिली आहेस. ती तर सर्वांत कठीण परीक्षा.”

“कल्याण, मी पुण्याला येऊन तिथूनच परत जाणार होतें. तुझ्याकडे येण्यांत खर्च होणारे पैसे विश्वासला झाले असते; परंतु आईजवळ आणखी मागितले पैसे.”

“आईला सारखी सतावूं नकोस.”

“आपल्या प्रेमाच्या माणसांनाच आपण सतावतों. वांसराच्या ढुशींनीं गाईला का त्रास होतो ?”

“तूं भलतंच बोलूं लागलीस !”

“तुझा गुण का माझ्यांत येऊं लागला ?”

दोघांनीं एकमेकांकडे पाहिलें. बोलणें थांबलें. संध्येचीं बोटें कल्याण पाहात होता.

“संध्ये !”

“काय ?”

“कांहीं नाहीं.”

“कांहीं तरी सांगणार होतास तूं. सांग. माझ्यापासून लपवून ठेवूं नकोस.”

“सुटलों म्हणजे आपण करूं हो लग्न. होऊं पतिपत्नी.”

“खरंच ?”

“हो, खरंच. परंतु वाटेल त्या स्थितींत राहावं लागेल.”

“मीं रे कधीं नाहीं म्हटलं ? तुझ्या संगतींत उपवासहि मला अमृतपान आहे हो, कल्याण. तुझ्या संगतींत मला सारं गोड आहे.
प्रिय आहे. कल्याण जवळ असला म्हणजे सारं रमणीयच असेल; नाहीं का ?”

“विश्वासला ही गोष्ट सांग.”

“सांगेन. आणि तूं प्रकृतीला जप.”

“तूं फळं आणलीं आहेस. तुझ्या भेटीचं टॉनिकहि मिळालं आहे. आतां मी लौकर बरा होईन. संध्ये, आज तूं जेवलीस का ?”

“मला तुझी भूक होती. तुला पोटभर खातां यावं म्हणून दुसरं कांहीं मीं खाल्लं नव्हतं. आतां बाहेर गेल्यावर खाईन.”

“माझ्या हातचं तूं घे हें फळ. खा.”

संध्येनें तें खाल्लें. दोघें आनंदलीं. हातांत हात घेऊन बसलीं. वेळ संपली. कल्याण व संध्या उठलीं. दोघांचे हात एकमेकांच्या
हातांत होते. ते त्यांनीं घट्ट धरले. दोघांचे डोळे भरून आले.

“जातें हं कल्याण. जप; बरा हो. संध्येसाठी तरी जप.”

“होय हो.”

संध्या मागें पाहात पाहात गेली. दरवाजा उघडला. पुन्हा बंद झाला. मनोमय कल्याणला बरोबर घेऊन संध्या बाहेर पडली. संध्या रडली, परंतु हंसली. कां हंसली ? कारण ती आनंदवार्ता घेऊन जात होती. कल्याणनें अभिवचन दिलें होतें. तिला नवजीवन मिळालें. तिचा हृद्रोग गेला. आणि इकडे कल्याणचें हृदयहि हलकें झालें. त्याच्या जीवनांतहि नवीन आशा, नवीन कर्तव्य यांचा उदय झाला. संध्या गेली. परंतु तिच्यासमोर भविष्य नाचूं लागलें. भविष्याची भीतिहि तिला वाटली. मी अशी बावळट, कसें होईल ? मी हरिणीसारखी शिकलेली असतें तर ? परंतु काय करणार ? असो. मी सर्वांची सेवा करीन, सर्वांना प्रेम देईन, त्रासलेल्यांना रिझवीन. संध्येचें हेंच काम. दिवसभर कष्ट करून, धांवपळ करून दमल्या भागलेल्या जगावर, त्रस्त संतप्त झालेल्या जगावर शांतीचे मंगल असे अमृतकुंभ भरभरून आणून सिंचणें हेंच संध्येचें पवित्र व गंभीर कर्तव्य !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel