अशीं रात्रीं त्यांचीं बोलणीं झालीं. भीमराव झोंपले. परंतु संध्येच्या आईला झोंप आली नाहीं. ती सचिंत झाली.

असे कांही दिवस गेले व तो एक दिवस आला. भीमरायांनीं ओळखलेली काळ-वेळ आली. ते नित्याप्रमाणें देवघरांत पूजा करीत होते. आज फारच भक्तिभावानें पूजा चालली होती. भीमराव तन्मय झाले होते. डोळे स्त्रवत होते. शरीर रोमांचित झालें होतें.

“संध्ये, बाळ, नीरांजन लावून आण बरं. जरा अधिक तूप घाल हो आज.” ते म्हणाले.

आजची पूजा फार सुंदर दिसत होती. शेवंतीचीं, गुलाबाचीं फुलें किती खुलून दिसत होतीं. आणि मधून मधून दुर्वा, तुळशी, बेल यांची हिरवळी; मंगल मंगल दृश्य. संध्येने नीरांजन आणिलें. उदबत्तीचा घमघमाट सुटला होता. भीमराव नीरांजन ओंवाळूं लागले व आरति म्हणूं लागले.

“आरति नारायणा
ओंवाळितों करुणाघना  ॥ आरति० ॥
प्राणांचें नीरांजन
तुला देवा ओंवाळून
चरणीं जाइन मिळून
जन्म-मरण मरून ॥ आरति० ॥
पुरे ही यातायात
नको संसाराची मात
धरीं देवा माझा हात
तूंच सद्गुरु तात ॥ आरति० ॥
आयुष्याचें सारें तूप
घालुन ओंवाळीतों दीप
येऊं दे तुझ्या समीप
तूंच माझा माय बाप  ॥ आरति० ॥

भीमराव ओंवाळतां ओंवाळतां समरस झाले. संध्या तो मंगल पवित्र देखावा पाहात होती. तीहि डोळे मिटून व हात जोडून तेथें विरघळून उभी होती. भीमरावांनीं नीरांजन खालीं ठेवलें व देवासमोर डोकें ठेवले. किती तरी वेळ झाला. तें डोकें वर झालें नाहीं. डोकें खालीं वांकलें, तें वांकलें !

संध्या बघत होती.

“आटपली कीं नाहीं पूजा ?” संध्येच्या आईनें विचारलें.

“आई, इकडे ये !” घाबरून संध्येनें हांक मारली.

“काय ग ?” आई येऊन म्हणाली.

सारींच तेथें आलीं. तिकडे पाटपाणी घेतलेले होतें. दुपारची जेवणाची वेळ. पुंडलिकरावहि आले. “अप्पा, अप्पा” त्यांनीं हांक मारली. परंतु अप्पा केव्हांच देवाघरीं गेले होते. त्यांनीं आपल्या पंचप्राणांचें नीरांजन शेवटचें ओंवाळलें. ते चैतन्यांत मिळून गेले. प्रकाशांत विलीन झाले. परंतु घरांत मात्र केवळ अंधार भरून राहिला. अधिकच अंधार, काळाकुट्ट, निराशेचा व शोकाचा अंधार, अथांग अंधार ! महिन्या दोन महिन्यांत तीन मृत्यु ! दु:खापाठीमागून दु:खें !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel