“कल्याण, तूं पुण्याहून मला पत्र पाठव.”

“तुला वाचतां येतं ?”

“मी का अडाणी आहें ? किती तरी पुस्तकं मीं वाचलीं आहेत. मला मराठी येत व कानडीहि येत. घरी लायब्ररी आहे, वर्तमानपत्रं
येतात.”

“संध्ये, आतां मी जातों.”

“एकटे जाल ?”

“हातांत हा सोटा आहे.”

“आणखी कोण आहे बरोबर ?”

“मनांत संध्या आहे.”

“कल्याण !”

“काय ?”

“आपण लहान आहोंत.”

“ते बघ संध्ये रंग; बहारीचे रंग.”

“कुठं ?”

“अग, आकाशांत. तुला कुठं वाटले ?”

“तुमच्या तोंडावर सुध्दां रंग आहेत.”

“आणि तुझ्या नाहींत वाटतं ?”

“ते तुम्हांलाच माहीत.”

“संध्ये !”

“काय ?”

“मी तुला एक गंमत देऊं ?”

“हं, दे. “

“ही घे ! “

“फोटो.”

“कुणाचा ?”

“कल्याण फोटो; किती छान आहे.”

“तुझा आहे का फोटो ?”

“नाहीं: तुला काढतां येतो ?”

“हो.”

“मग काढ व ने.”

“तूं डोळे मीट म्हणजे मी काढतो.”

संध्येने खरेंच डोळे मिटले. कल्याण तिच्याकडे पाहात होता.

“उघडूं का डोळे ?”

“थांब जरा !”

कल्याण पाहात होता.

“किती वेळ मिटायचे तरी ?” असें म्हणून तिनें डोळे उघडले.

“छान निघाला फोटो.”

“पण डोळे मिटलेले आले ना ?”

“तूं डोळे मिटले होतेस तरी तुला दिसत होतं कीं नाही ?”

“हो.”

“काय दिसत होतं ?”

“तुम्ही दिसत होतेत.”

“म्हणजे तुझे डोळे उघडे होते एकूण ! “

“आंत उघडे होते. परंतु माझा फोटो काढलात तो दाखवा ना ? पाहूं दे मला.”

“संध्ये, तूं वेडी आहेस. अग, मीं तुझा फोटो माझ्या मनांत काढला. “

“मनांत ?”

“हो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel