संध्या नि कल्याण स्टेशनवर येऊन गाडींत बसलीं. आज त्यांचा एकत्र प्रवास होता. पहिलाच प्रसंग. परंतु कोणीहि बोलत नव्हतें. शत भावनांनीं त्यांचीं हृदयें भरून आलीं होती. गाडींत गर्दीहि होती. संध्या सुखावली होती. तिच्या मनांतील आशा आज पूर्ण झाली होती. सारे मनोरथ सफल झाले होते. हृदय समाधानानें नि कृतज्ञतेनें भरून आलें होतें. आणि कल्याण ? तोहि आनंदला होता. परंतु त्याच्या आनंदांत दु:खाचीहि छटा होती. ती जरी तितकीशी दिसून येत नव्हती, तरी होती.
“कल्याण, कल्याण, तीं बघ हरणं !” संध्या टाळी वाजवून म्हणाली.
“कुठं आहेत ?”
“गेलींसुध्दां. किती वेगानं गेलीं ! “
“संध्ये, सुखंसुध्दां अशींच असतात. दिसतात न दिसतात तों दूर जातात.”
“परंतु सुखाच्या स्मृतिहि गोड असतात. त्या झाडाखालीं तूं झोंपलेला होतास. आणि मी येऊन तिथं उभी होतें. किती तरी वेळ तुझ्याकडे बघत उभी होतें. तो प्रसंग आठवला म्हणजे अजूनहि उचंबळून येतं.”
“चंद्रहास झोंपलेला असतांना विषया अशीच येऊन उभी होती.”
“चंद्रहास केवढा ईश्वरभक्त ! त्याच्याजवळ तो शाळिग्राम होता. शेल्याच्या टोंकाला बांधलेला. कल्याण, तुला नाहीं ना देव आवडत ? परंतु मी तर त्याला आळवीत बसतें. माझ्या ट्रंकेंत लहानशी सुंदर मूर्ति आहे.”
“तूं मुंबईला त्या मूर्तीची का पूजा करीत बसणार ?”
“मी एकटी असेन तेव्हां करीन.”
“माझे सारे मित्र तुला हंसतील.”
“मी त्यांची कींव करीन.”
“मला म्हणतील कीं, ही कुठली पुराणकाळांतील बायको आणलीस ! “
“कल्याण, तुला त्यांत कमीपणा का वाटेंल ? ज्यामुळं तुला कमीपणा येईल तें मी कधींहि करणार नाहीं. माझा देव ट्रंकेंतच राहील. तिथंच मी त्याचं मधून मधून दर्शन घेत जाईन. मग तर झालं ?”
“संध्ये, तीं शेतं बघ जरा; हिरवीं हिरवीं दिसत आहेत. इकडे पाऊस पडला आहे.”
“पृथ्वीच्या अंगावर जणूं हिरवे रोमांच उठले आहेत.”
“पर्जन्यदेव भेटीला आला आहे म्हणून.”
दोघें बाहेरची शोभा पाहात होतीं. मागें कल्याणला भेटण्यासाठीं म्हणून जेव्हां संध्या गेली होती, तेव्हां रात्रीच्या गाडीनें ती गेली होती. आज दिवसाची आतां वेळ होती. रात्रीं आठ-नऊच्या सुमाराला तीं पुण्याला पोंचणार होतीं.
“कल्याण, हा कोणत्या नदीवरचा पूल ?”
“अग, ही कृष्णा.”
“आपली भीमा पुढं कृष्णेलाच मिळाली आहे.”
“हो.”
“कल्याण, आपल्या दोघांचीं जीवनं उद्यां कशाला मिळणार ?”
“आपलीं संयुक्त जीवनं क्रांतीच्या समुद्राला मिळणार.”
“मी तुझ्या क्रान्तींत कोणतं रे काम करूं, कोणता भाग घेऊं ? मी रात्रंदिवस विचार करतें. परंतु माझ्या कांहीं ध्यानांत येत नाहीं.”
“वेळ आली म्हणजे आपोआप समजेल. संध्ये, तूं जरा नीज. काल रात्रीं घरीं आपण किती वेळ बोलत होतों.”
थोडी जागा झाली होती. संध्या निजली. कल्याण कांहीं तरी वाचीत होता. संध्येच्या तोंडावर खिडकींतून ऊन येत होतें. त्यानें खिडकी लावली. त्याचें आतां वाचनांत लक्ष नव्हतें. त्यानेंहि डोळे मिटून घेतले. बसल्या बसल्या जणूं तोहि झोंप घेत होता. थोडया वेळानें संध्या उठली.