९
कल्हईचे प्रयोग
दुस-या दिवशीं खरोखरच त्या दोघांनीं कल्हईचें काम करण्याचें ठरविलें. त्यांनीं सामान आणलें. एका पोत्यांत कोळसा, भाता, चिमटा, नवसागर, कथिल, सारें सामान त्यांनीं आणलें. आणि आश्चर्य म्हणजे बरोबर वाचायला पुस्तकेंहि होती. नाहीं काम मिळालें तर झाडाखालीं वाचीत बसले.
“कल्याण, कोणत्या बाजूला जायचं ?”
“जाऊं डेक्कन जिमखान्याकडे.”
“मी ओरडेन. माझा आवाज मोठा आहे.”
“विश्वास, तूं सभेंत ओरडशील. पण रस्त्यांत ओरडतांना लाजशील.”
“नाहीं लाजणार. बघ, छान ओरडेन. ओरडायचं माझंच काम. तूं त्या झाडाखालीं सामान घेऊन बैस. मी भांडी गोळा करून आणतों.”
कल्याण एका झाडाखाली बसला. पुस्तक काढून वाचीत बसला. विश्वास ओरडायला गेला. कानांवर हात ठेवून “कल्हई लावाच्ये कल्होई” असें तो ओरडत निघाला. कल्याणच्या कानांवर ते शब्द येत होते. त्यानें आजूबाजूला जागा साफ केली व भाता रोंवला. तयारी करून कम्युनिस्ट जाहीरनामा तो वाचीत बसला.
“काय रे विश्वास !” एका मुलीनें हांक मारली.
“विश्वास ओशाळला, लाजला. परंतु क्रान्तिकारकानें लाजतां कामा नये. तो बेफिकीर, बेगुमान हवा. विश्वासनें लाजलज्जा सोडली व तो म्हणाला, “कल्हईला भांडी मिळतात का पाहतों आहें.” आणि तो पुन्हां एकदां “कल्हई लावाच्ये का कल्होय” असें छान ओरडला. ती मुलगी हंसली व म्हणाली, “विश्वास, छान नक्कल करतोस. तूं का कल्हई लावणार ? हात मात्र भाजतील.”
“प्रथम भाकरी भाजतांना बायकांचेहि भाजतात.”
“हरिणीला का नाहीं बरोबर घेतलीस ?”
“घेईन वेळ येईल तेव्हां.”
“विश्वास, तुला कॉलेजांतून काढलं ना ?”
“घरांतूनहि काढलं.”
“मग ? “
“आतां कल्हई-” असें म्हणून विश्वासनें पुन्हां ललकारी दिली.
“मी देऊं का तुला भांडी आणून ?”
“दे. तुझ्या कोणी ओळखीचं आहे का इथं ?”
“हो. हीं घरं माझ्या परिचयाचीं आहेत.”
ती मुलगी एका घरांत गेली. विश्वास बाहेर उभा होता. मधून मधून धंद्याची ललकारी देत होता. ती मुलगी पंचवीस भांडीं घेऊन आली.
“ए कल्हईवाल्या, काय शेंकडा लावणार रे ?” ती मुलगी हंसून म्हणाली.
“तुम्ही द्याल ते पैसे, ताईसाहेब.” विश्वास हंसून म्हणाला.
“विश्वास, अशानं तुमचं दिवाळं निघेल. कल्हई, कोळसे, नवसागर यांचा खर्च निघून पोटाला उरलं पाहिजे ना ?”
“तो हिशोब कल्याणला माहीत असेल.”
“हा कोण कल्याण ?”