माझें लग्न लागलेलें आहे

संध्येला एका पाठीमागून एक प्रियजनांचीं मरणें पाहावीं लागलीं. जणूं मरणाशीं तिचा परिचय होत होता. मरणाचे आघात सहन करण्याचा जणूं तिला अभ्यास होत होता. संध्या अकालीं गंभीर झाली. तिचें हास्य मंदावलें. खेळकरपणा कमी झाला. ती दु:खीकष्टी चेहरा करीत नसे. परंतु तिचें हंसणें पूर्वीप्रमाणें खेळकर नव्हतें. तिचें हंसणेंहि जरा गंभीर वाटे.

भीमराव गेल्यावर कांहीं दिवसांनी पुंडलिकराव वेगळे झाले. नारायणरावांचें कुटुंब मुलें घेऊन माहेरीं राहायला गेलें. संध्येची आई उडगी गांवांतच राही. तें लहानसे स्वतंत्र घर होते. शेतीवाडी वांटली गेली. संध्येची आई सारें पाहूं लागली. संध्येची आई हुशार व धोरणी होती. शेतीवाडी तिनें खंडानें देऊन टाकली. खायलाप्यायला घरीं कांहीं कमी पडलें नसतें. संध्येला दोन लहान भावंडे होतीं. अनु व शरद्. दोघें शाळेंत जात. संध्या घरींच आईला मदत करी. दुपारीं वाचून दाखवी. स्वत:हि वाची.

बरेच दिवसांत संध्येनें कल्याणला पत्र लिहिलें नव्हतें. घरांतील मरणांनी राष्ट्राचे झेंडे ती विसरून गेली होती. ती आतां पुन्हां पूर्वींच्या जीवनांत आली. अंधार दूर गेला. धुकें उडालें. पुन्हां प्रकाश येत होता. बाह्यत: ती कल्याणला विसरली होती. परंतु मनांत तो वाढतच होता. पहिली वाढ अंधारांत होते. नकळत होत असते.

मरणाची दु:खें मागें पडलीं. पुन्हां कल्याण दिसूं लागला. मल्लमूर्ति कल्याण ! प्रेमळ व काळयाभोर डोळयांचा कल्याण ! तिनें त्याला पत्र लिहिलें.

“प्रिय कल्याण,

तुला नमस्कार लिहूं, कीं काय लिहूं ? पूर्वी मी तुला नमस्कार लिहीत असें; परंतु नमस्कार दुरून करावा लागतो. मी का तुझ्यापासून दूर आहें ? तूं का माझ्यापासून दूर आहेस ? कल्याण, तूं अगदीं माझ्याजवळ आहेस. तूं माझ्याजवळ नसतास तर ह्या तीनचार महिन्यांतील दु:खं मीं कशीं सहन केलीं असतीं ? तुला माहीत नसेल, परंतु केवढाले प्रसंग आमच्यावर आले ! माझे सर्वांत वडील चुलते एकाएकीं देवाघरीं गेले. आणि माझ्यावर प्रेम करणारी आजी तीहि गेली. काका तिकडे गेले व इकडे आजीनं विहिरींत उडी घेतली. किती प्रेम ! जगांत कुठं असेल रे असं प्रेम ? कल्याण, मी मरेन का रे तुझ्यासाठीं ? तूं मरशील का माझ्यासाठीं ? मरण का सोपं असेल ? आजीनं विहिरींत नाहीं उडी घेतली, जणूं प्रेमसागरांत तिनं बुडी मारली. नारायणकाका गेले, आजी गेली, आणि कल्याण, थोडया दिवसांनीं माझे वडीलहि गेले ! तुझी संध्या पितृहीन झाली. मरणाआधीं बाबा किती प्रेमळ झाले होते. ते मला बाळ अशी हांक मारीत. ते मला जवळ घेत, उपदेश करीत. एके दिवशीं ते मला फिरायला घेऊन गेले. भीमेच्या तीरावर किती तरी वेळ आम्ही बसलों होतो. किती तरी बोलत होतो. बाबांचं जीवन म्हणजे एक कोडं होतं. त्यांचं जीवन म्हणजे एक झगडा होता. या पृथ्वीवरची हवा त्यांच्या आत्महंसाला जणूं सहन होईना. त्यांचा प्राणहंस उडून गेला. आणि आतां आम्ही सारीं वेगळीं झालो. पूर्वी मोठया घरांत आम्हीं राहात होतों. आतां आई व आम्ही भावंडं एका छोटया घरांत राहतों.

कल्याण, पूर्वी त्या मोठया घरांत आईचं प्रेम मला अनुभवतां आलं नाही. तें आतां भरपूर चाखतां येतं. शरद् व अनु शाळेंत जातात. आई व मी दोघं घरीं. पूर्वी आई मला राग भरे, मारीहि. परंतु आतां कधीं चुकूनहि रागवत नाहीं. घरांतील एका पाठीमागून एक झालेल्या मरणांनीं माझी आई का प्रेमळ झाली ? तापून लोखंडहि मऊ होतं. मग माणसं का लोखंडाहून कठोर असतील ?

आईच्या प्रेमाचा आस्वाद तुझी संध्या घेत आहे. आजीच्या प्रेमाला सुकलेली, आंचवलेली संध्या आईच्या प्रेमाची मालकीण बनली आहे. मी आईला पुस्तकं पोथ्या वाचून दाखवतें. आईला कठीण भाग समजावून देतें. संध्या हुशार आहे. हंसतोस काय, कल्याण ? आजीनं मला हुशांर केलं आहे. तूंहि हुशार झाला असशील. पुण्यांतील कुत्रींसुध्दा सुंदर व्याख्यानं देतात असं काका म्हणाले होते. नेहमीं व्याख्यानं ऐकून कुत्रींसुध्दा हुशार कां होणार नाहींत ? आणि जिथलीं कुत्री इतकीं हुशार, तेथील माणसं किती हुशार असतील ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel