२०
भाईजी गेले
हरणी, विश्वास, रंगा, कल्याण सारीं आतां एकत्र राहात. हरणी आतां स्वयंपाक करी. विश्वासहि तिला मदत करी. भाईजींना आतां कोणी काम करूं देत नसत. परंतु हरणीला नोकरी मिळाली का ? ज्यांनीं कबूल केलें होतें, त्यांच्याकडे विश्वासनें सातदां खेपा घातल्या. परंतु ते कांहींच उत्तर देत ना. शेवटीं एके दिवशी विश्वास रागावून त्यांना म्हणाला :
“हो का नाहीं तें सांगून टाका. मागं प्रथम म्हणालेत कीं हरणीची मॅट्रिकची परीक्षा होऊं दे, मग नोकरी देऊं. ती मॅट्रिक झाली. मग म्हणूं लागलेत तिचं लग्न होऊं दे, मग नोकरी देऊं. आतां तिचं लग्नहि लागलं. आतां आणखी कोणती अट आहे ?”
“हें पाहा, विश्वास, मी नोकरी देणार होतों; परंतु माझा इलाज नाहीं. तुम्ही मार्क्सवादी भाईलोक ! सारे तुम्हांला नोकरी देण्याच्या विरुध्द आहेत. मी एकटा काय करूं ?”
“या गोष्टी का तुम्हांला पूर्वीच माहीत नव्हत्या ?”
“माहीत होत्या, परंतु मला आशा होती, कीं कांहीं तरी करून हरणीला लावून घेतां येईल. परंतु माझे प्रयत्न फसले. मी दिलगीर आहें.”
विश्वास निघून गेला. त्याला वाईट वाटलें. पुन्हां आर्थिक अडचण आली. पसारा तर मांडलेला. खोलीचें भाडें दोन महिन्यांचें द्यायचें राहिलेलें. संध्या आजारी. भाईजी कफल्लक झालेले. काय करणार ?
“विश्वास, काय म्हणाले रे ते ?” हरणीनें विचारलें.
“नाहीं मिळत नोकरी.” विश्वास म्हणाला.
“मी शिकेनच आणखी; नाहीं नोकरी तर नाहीं.”
“आणि फी कुठून भरायची ?”
“आई देणार आहे फी. मीं पुष्कळ शिकावं असं आईला वाटत असे. मी अद्याप शिकायला तयार असेन, तर ती पैसे देणार आहे. तिच्याजवळ माझं बोलणं झालं आहे. तुझी हरकत नाहीं ना ?”
“मी कशाला हरकत घेऊं ?”
“मग तूं असा निरुत्साही कां दिसतोस ?”
“हरणे, तुला नोकरी मिळेल या आशेवर आम्ही होतों. परंतु ती आशाहि संपली. भाडं द्यायचं राहिलं आहे. वाण्याचे पैसे द्यायचे आहेत. संध्याहि आतां घरीं येईल; तिला टॉनिक वगैरे द्यावं लागेल. कसं करायचं ?”
“बाळच्या आईजवळ मी मागूं का थोडे पैसे ?”
“माग. मला तर तें धैर्य नाहीं. “
“विश्वास, हल्लीं तुमच्या लोकांत चर्चा चालल्या आहेत. माझ्या कानांवर थोडंथोडं येतं. काय करायचं ठरलं ?”
“अद्याप मतभेद आहेत. कोणी म्हणतात कीं युध्दविरोधी भाषणं करून सर्वांनीं तुरुंगांत जावं, कोणी म्हणतात कीं काम करीत असतां, संघटना वाढवीत असतां अटक झाली तर होऊं द्यावी. मुद्दाम तुरुंगांत जायचं ध्येय करूं नये.”