“विश्वास, तुझं कसं आहे आज ?” हरिणीनें विचारलें.
“आज अद्याप ताप नाहीं. तुला शिकवतों.”
“आज नकोच नाहींतर. या आल्या आहेत.”
“त्या इथं कांहीं दिवस राहणार आहेत. त्या कांहीं परक्या नाहींत. शिकायला लाजतेस वाटतं ?”
“इश्श, लाजायला काय झालं ? तूं मात्र लाजूं नकोस म्हणजे झालं.”
विश्वास हरिणीला शिकवूं लागला. संध्या आंतल्या खोलींत अंथरुणावर पडली. तिला झोंप लागली.
शिकवतां शिकवतां विश्वास रागावला. त्यानें पुस्तक आपटलें व तो म्हणाला, “तूं घरीं कांहीं वाचीत नाहींस, तर कशाला येतेस ?”
“मला नाहीं रे सारखं हें वाचायला आवडत.” ती म्हणाली.
“पास झालं पाहिजे बघ.”
“नाहीं पास झालें तर ?”
“हरणे, मग कसं व्हायचं ? तूं पास झालीस तर ते तुला नोकरी देणार आहेत. मग तुझा विश्वास उपाशी नाहीं राहणार. प्रेमावर नुसतं जगतां नाहीं येत.”
“विश्वास, घरीं सारं काम मला करावं लागतं. वडील वारल्यापासून हें असं चाललं आहे. वडील कौतुक करीत. हरिणीला काम नका सांगूं असं ते म्हणत. परंतु आतां काय ? आईलाहि बरं नसतं. दादा नुसता खाबू. मला मात्र वाटेल तसं बोलतो. विश्वासकडे गेलीस तर बघ असं म्हणतो. तरीहि मी अभ्यास करतें. पुन: तुमच्या अभ्यासमंडळांना येतें. काय काय रे मी करूं ?”
“तें कांहीं असो. परंतु पास झालं पाहिजे.”
संध्या आतां उठली होती. हरिणी जायला निघाली.
“जातें हं मी.” हरिणी संध्येला म्हणाली.
“उद्यां याल ना.” तिनें विचारलें.
“येईन.”
हरिणी गेली. संध्या घरांत सारें पाहूं लागली. तों घरांत काय होतें ? थोडेसे तांदूळ, थोडी डाळ. तेलही संपलें होतें.
“विश्वास, सायंकाळी काय करूं ?”
“संध्याताई, काय करायचं संध्याकाळीं ?”
“विश्वास, मघां हरिणीजवळ तुम्ही म्हणालांत कीं मग विश्वास उपाशी नाहीं राहणार ? तुम्ही का कधीं कधीं उपाशी राहतां ?”
“होय; कुठून आणायचे पैसे ? कोणी मित्र कधीं देतो. कधीं आम्ही कुठं काम करतों. ढकलतों गाडं. संध्याताई, आज घरांत कांहीं नाहीं. तुम्हांला इथं राहा म्हटलं, पण खायचं काय ? भाईजी पाठवणार होते पैसे. पण अद्याप आले नाहींत.”
“हे भाईजी कोण ?”
“असेच एक लाभलेले नवीन मित्र. आमच्याहून वयानं मोठे आहेत. परंतु भावनांनीं व विचारांनीं थोडे आमच्याचसारखे. “
“ते का श्रीमंत आहेत ?”
“नाहींत.”
“मग ते तरी कुठून पाठवणार ?”
“ते भिक्षा मागतात व ती मदत आम्हांला पाठवतात. कधीं कांहीं लिहितात. मिळाले पैसे तर आम्हांला देतात.”
“विश्वास, हे माझ्याजवळचे पैसे घ्या. सामान आणा. मी आलें आहें, तर दोन दिवस तरी पोटभर जेवा. मी जेवण करून वाढीन.”
“संध्याताई, आमचा खळगा नेहमींच आहे. तुमचे पैसे खर्च झाले, तर उद्यां कल्याणला भेटायला कशा जाल ?”
“मी जास्त पैसे घेऊन आलें आहें. आईला लिहून आणखीहि पैसे मागवून घेईन. विश्वास, माझे पैसे घ्यायला तुम्ही संकोच नका करूं. तुम्ही मित्र जिवाला जीव देतां. मी तुमच्या मित्राचीच पत्नी ना ?”