कल्याण म्हणत होता. आणि तिकडे संध्येचें तोंड अधिकच सुंदर नि सुकुमार दिसत होतें. प्रेमाची लावण्यमयी कोंवळी प्रभा तेथें पसरली होती. कल्याणचें लक्ष आकाशांतील संध्येकडून गाडींतील जवळच्या संध्येकडे एकदम आलें. ती अति गोड हंसली. तिचे ते स्वच्छ शुभ्र दांत मोत्यांप्रमाणें झळकले. आणि आईनें दिलेलीं टपो-या मोत्यांचीं तीं सुंदर कुडीं ! संध्येच्या कानांत तीं शोभत होतीं. पाठीमागें काळेभोर केंस रेशमाप्रमाणें मऊ शोभत होते.

“कल्याण, तूं ते चरण म्हणत होतास. किती गोड आहे त्यांतील भाव, नाहीं ? थकून भागून आलेल्या सूर्यनाथाला आपल्या हृदयांतील भावनांच्या लाटांनीं पश्चिम दिशा स्नान घालीत आहे ! सुरेख कल्पना ! “

“संध्ये, मनुष्याच्या हृदयसिंधूवरील लाटा तोंडावर उठतात, नाहीं ?”

“परंतु कांहीं माणसं त्या लाटा आंतल्या आंतच दाबतात.”

“संध्ये, माझा आनंद मीं का लपवला आहे ? जगासमोर आपलं सुख वा दु:ख यांचं सारखं प्रदर्शन करूं नये, एवढंच मला वाटतं.”

“परंतु इथं तर तुझं-माझंच जग आहे. मी का परकी आहें ?”

“परंतु तुझ्यापासून मीं काय लपवलं ? माझा हा हात तुझ्या हातांत आहे. माझी नाडी तुझ्या हातांत आहे. माझीं बोटं तुझ्याशीं का बोलत नाहींत ? तीं का मुकीं आहेत ? माझ्या ह्या थरथरणा-या बोटांतून माझ्या हृदयाचं संगीत तुला नाहीं ऐकूं येत ? हृदयांतील भावनांच्या लाटां तुला नाहीं समजून येत ? संध्ये, आपण एकमेकांपासून कधींहि कांहींहि लपवून ठेवायचं नाहीं असं या क्षणीं ठरवूं या. आपल्या प्रेमाच्या राज्यांत प्रेमळ मोकळेपणा असूं दे. ठरलं ना ?”

“कल्याण, असे का करार करायचे असतात ? ठरवायला नको. तें सहज होईल. तुला भूक लागली आहे ना ? दुपारीं तूं जेवला नाहींस पोटभर.”

“त्या वेळीं पोट भरून आलं होतं. परंतु आपल्या गाडींत कांहीं आहे का फराळाचं ?”

“मी मुद्दामच घेऊन ठेवलं आहे बरोबर. म्हटलं कल्याण आहे भुकेचा हळवा. असूं दे शिधोरी बरोबर.”

संध्येनें करंडी सोडली. तिनें कल्याणला करंज्या, कडबोळीं दिलीं. गाडीवानालाहि दिलीं. संध्या कल्याणला देत होती. तो खात होता. शेवटीं ती हंसली.

“काय ग झालं हंसायला ?”

“म्हटलं, खाणार तरी तूं किती ? आतां पुरे हो. सोसायचं नाहीं.”

“तूं जरूर तेवढं देशील अशा भरंवशावर मी होतों. आतां पुरे करूं ? तूं कांहीं खाल्लंस का ?”

“तूं देशील तेव्हां ना मी खाईन ?”

“आण ती करंडी. मी तुला देतों.”

कल्याण संध्येला देत होता. ती खात होती. ती सुखावली होती. तिनें मध्येंच तोंड पुढें केलें. कल्याणनें तिच्या तोंडांत घांस दिला. ती उचंबळली.

“पुरे. आतां पोट भरलं.” ती म्हणाली.

त्या शेवटच्या घांसानरें खरेंच तिचें पोट भरलें असेल. भावना म्हणजे एक अपूर्व वस्तु आहे. त्याच त्या साध्या वस्तु असतात. परंतु भावनेच्या योगानें तेथें आपण नवें विश्व उभारतों. नवी दुनिया रचतों. त्या साध्या वस्तूंच्याभोंवतीं आपण तेजोवलय, सौंदर्यवलय निर्मितों. तीच वडी, तोच लाडू, तीच भाकर, तीच भाजी. सारें तेंच. परंतु त्या वस्तु कोणीं केल्या, कोणीं आपल्याला दिल्या, यावर किती अवलंबून असतें ! मनुष्य शेवटीं भावनामय नि विचारमय आहे. भावना नि विचार हेंच त्याचें खरें जीवन. त्याचा आत्मा बाह्य सृष्टीवर शेवटीं विजय मिळवितो; जड सृष्टीच्या वर उड्डाण करतो. आईच्या हातचा कोंडा खाऊन मांडा मिळाल्याप्रमाणें तो नाचतो. परंतु परक्याच्या हातची जिलबी खाऊनहि तें समाधान त्याला मिळत नाहीं. सांगा तर मग, महत्त्व कशाला ? माझ्या भावनामय मनाला का बाह्य सृष्टीला ?

चैतन्याला महत्त्व कीं जडाला ? संध्येला जाऊन विचारा. कल्याणपेक्षां तीच अधिक बरोबर उत्तर कदाचित् देईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel