१२

संध्या नि कल्याण यांचा विवाह

कल्याण तुरुंगांतून सुटला. त्याला मुंबईचें तिकीट मिळालें होतें. तो सरळ मुंबईला आला. तेथील कार्यकर्त्यांना भेटला. आपण लौकरच विवाह करणार आहोंत असें त्याने त्यांना सांगितलें. त्या सर्वांनीं त्याचें अभिनंदन केलें. मुंबईहून तो पुण्याला आला. त्याचा जिवलग मित्र विश्वास तेथें होता. विश्वास आजारी होता. तो अशक्त झाला होता. अंथरुणांत पडून होता. त्याच्या डोळयांतील तेज मात्र अद्याप तसेंच होतें. कोणी कोणी म्हणत कीं विश्वासला क्षय होणार; परंतु डॉक्टर धीर देऊन सांगत कीं, पूर्ण विश्रांति नि पौष्टिक आहार मिळाला, तर प्रकृतीला धोका नाहीं.

परंतु पौष्टिक आहार कुठून आणायचा ? जेथें साधी मीठभाकर मिळण्याची पंचाईत, तेथें कोठला पौष्टिक आहार ? कल्याण येऊन विश्वासजवळ बसला. दोघेहि मित्र स्तब्ध होते. बोलणार तरी काय ?

“विश्वास, तूं किती वाळलास ?” शेवटीं कल्याण बोलला.

“तूं काळजी करूं नकोस. तूं आतां लग्न. कर संध्येला घेऊन ये. मग तिच्या हातचं सुग्रास जेवण मला मिळत जाईल. मी बरा होईन.”

“आणि बाळ कुठं आहे ?”

“त्याचीहि प्रकृति बरी नाहीं. तो हवापालट व्हावा म्हणून एका दूरच्या आप्ताकडे गेला आहे. बाळ म्हणजे रत्न आहे, नाहीं ? परंतु आपल्यांतीलच कांहींना त्याचा मत्सर वाटतो. काय करायचं ? जगांतून हेवेदावे, हे मत्सर कधींच नाहीं का दूर जाणार ?”

“दुस-याच्या गुणांचा गौरव करणं ही गोष्टहि तितकीशी सोपी नाहीं. ज्याप्रमाणं दुस-याजवळच्या संपत्तीचा आपणांला हेवा वाटतो, त्याप्रमाणंच दुस-याजवळच्या थोर दैवी संपत्तीचाहि आपणांस मत्सर वाटतो.”

“परंतु संपत्ति दुस-याच्या श्रमानं निर्माण झालेली असते. श्रमणा-याला त्यानं स्वत:च निर्मिलेली संपत्ति जर मिळाली नाहीं, तर त्यानं मनांत द्वेषमत्सर बाळगावा हें साहजिक आहे. आपणच निर्माण केलेल्या संपत्तींतून आपणांवरच पिळवणूक व्हावी, जुलूम व्हावा, ही गोष्ट संतापजनक आहे; परंतु सद्गुणसंपत्तीचा मत्सर काय म्हणून वाटावा ?”

“तूं शांत पडून राहा. हरिणीचा अभ्यास कसा काय आहे ? पुन्हां बसणार ना परीक्षेला ?”

“बसणार आहे. बाळ इथं असला म्हणजे तिला तो शिकवतो. हरिणी पास झाली म्हणजे बरं होईल.”

विश्वास डोळे मिळून पडून राहिला. कल्याण विचारमग्न होऊन त्या खोलींत फे-या घालीत होता. त्याच्या मनांत कोणते विचार खेळत होते ? क्षणांत तो आपल्या हाताच्या मुठी वळी; क्षणांत कोठें तरी बघत उभा राही; खिडकींतून दूरवर पाही; शेवटीं तोहि अंथरुणावर पडला. दोघे मित्र निद्रामाउलीच्या कुशींत विश्रान्ति घेत होते.

सकाळ झाली. वर्तमानपत्रे विकणारीं मुलें ओरडत होतीं. बाहेर थंडी होती. परंतु त्या मुलांना थंडीचा विचार करून कसें चालेल ? वर्तमानपत्रें खपतील तेंव्हां दोन दिडक्या मिळणार ? कल्याण अंथरुणांत जागाच होता. त्यानें खालीं जाऊन ताजा अंक घेतला. तो वर आला नि वाचीत बसला. त्याला एक विशेष बातमी सांपडली. त्यानें एकदम विश्वासला हांक मारली.

“विश्वास, अरे उद्यां पुण्यांत एक जंगी मिरवणूक निघायची आहे. शस्त्रास्त्रबंदी उठवावी म्हणून मिरवणूक. आणि सर्व पक्षांचे लोक तींत सामील होणार आहेत.”

“काँग्रेसचेहि ? त्यांचं तर अहिंसा-व्रत आहे ना ?”

“विश्वास, महात्माजींनीं १९३० सालीं सरकारकडे अकरा मागण्या केल्या होत्या. त्यांतील एक मागणी शस्त्रास्त्रं वापरण्यास परवानगी असणं ही होती. तूं विसरलास वाटतं ? अहिंसा-तत्त्व महात्माजींचा जीवन-सिध्दान्त आहे. परंतु त्यांची अहिंसा दुबळेपणा शिकवीत नाहीं. हातीं शस्त्र असूनहि आम्ही अहिंसक राहूं असं हिंदी राष्ट्रानं जगाला शिकवावं असं त्यांना वाटतं. आणि त्यांनींहि एकदां नव्हतं का लिहिलं, कीं मी जरी अहिंसा शिकवीत असलों, तरी उद्यां स्वतंत्र हिंदुस्थानांत सैन्य राहणारच. हिंदुस्थाननं आपण होऊन स्वेच्छेनं शस्त्रसंन्यास केला आहे असं दृश्य चारपांच हजार वर्षांपर्यंत तरी दिसेल कीं नाहीं कुणाला ठाऊक ? काँग्रेस जनतेच्या आत्म्याला खच्ची करूं इच्छित नाहीं. म्हणून कांहीं काँग्रेसचे लोकहि निदान अनधिकृत रीत्या उद्याच्या मिरवणुकींत सामील   झाले, तर त्यांत शिस्तीविरुध्द असं कांहीं नाहीं. स्वत: महर्षि सेनापति बापट होतीं तिरंगी झेंडा घेऊन मिरवणुकींत भाग घेणार आहेत. संघवाले भगवा झेंडा घेऊन येणार आहेत. विश्वास, आपण लाल बावटा घेऊन जावं.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel