“कल्याण, तूं घरीं केव्हां जाणार ?”
“पैसे कुठं आहेत, घरीं जायला ?”
“काका नाहीं का देत ?”
“काका म्हणाले, आतां उतरायला आला आहेस तर राहा दोन दिवस. परंतु माझ्याकडे अत:पर तुझा संबंध नको. चळवळीं पोरं आम्हांला नकोत. तुला शिकवलं तें का तुरुंगांत जाण्यासाठीं ? तुला आमच्या खात्यांत लावून देणार होतों. परंतु तुम्हांला देशभक्ति हवी. करा देशभक्ति. हवेवर राहा, पाणी प्या, झाडाखाली झोंपा; करा देशभक्ति. ते किती तरी बोलले, सारं ऐकून घेतलं. ते का पैसे देतील ?”
“मग काय करणार तूं “
“तूं दे ना आणून.”
“मी कुठून देऊं ? काय रे, तुझ्या संध्येला लिही ना ! ती पाठवील पैसे. का तिला विसरलास ?”
“तिला विसरायचा प्रयत्न करीत होतों. परंतु पूर्ण यश आलं नाहीं.”
“तिच्याजवळ माग पैसे. तिला आनंद होईल. प्रेमाच्या माणसाजवळ मागितल्यानं त्याला आनंद होतो.”
“खरंच का मागूं ?”
“हो.”
कल्याणनें संध्येला पत्र लिहिलें व पैसे मागितले. तिचा खरोखरच आनंद झाला. कल्याण मला आपली मानतो म्हणून त्यानें पैसे मागितले. मी त्याला दूरची असतें तर तो मागता ना असें तिला वाटलें. कल्याणनें दाखविलेला हा आपलेपणा तिला अमृताप्रमाणें वाटला. तिचें तोंड फुललें. तिच्या आशेला अंकुर फुटले. मनुष्याची आशा अमर आहे. जरा आधार, ओलावा मिळताच ती पुन्हां हिरवी हिरवी दिसूं लागते. कल्याण माझाच आहे. तो माझाच राहील. कोणत्या का नात्याने असेना, तो माझा राहील. मीं त्याच्याशीं मनोमय वैवाहिक नातें जोडलें आहे. कल्याण कोणतेंहि जोडो. तो मला स्मरतो, आपुलकी दाखवितो. किती छान. देवाला माझी दया आली एकूण. किती तरी कल्पना व भावना तिच्या हृदयांत नाचूं लागल्या. ती आईजवळ गेली व म्हणाली,
“आई, मला दहा रुपये देशील कुठून तरी ?”
“दहा रुपये ? कशाला ते ?”
“हवेत; देशील का ?”
“परंतु कुणाला द्यायचे आहेत ?”
“कुणाला देणार ? माझं दुसरं कोण आहे, आई ? “
“कल्याणसाठीं का ? “
“हो.”
“कुठं आहे हो ?”
“तुरुंगांतून तो सुटला आहे. पुण्याला आला आहे. त्याला इकडे यायला पैसे नाहींत. कसा येणार तो घरीं ? कसा भेटणार आपल्या आईबापांना ? कसा भेटेल तुझ्या संध्येला ? आई, देशील का ?”
“संध्ये, मजजवळ तर नाहींत. भावजींजवळून आणायला हवेत.”
“मग आज--”
“ते कशाला म्हणून विचारतील तर काय सांगूं ?”
“सांग कांहीं तरी; किती ग आई आढेवेढे ?”
संध्येच्या आईनें दहा रुपये तिला दिले. तिनें ते पाठविले. कल्याणला आनंद झाला. त्याच्या डोळयांसमोर संध्या नाचू लागली. तुरुंगांत तो मनांत म्हणे कीं, संध्येला आतां कांहीं दिवस तरी भेटायचें नाहीं. परंतु संध्येला केव्हां भेटूं असे आतां त्याला झालें. आणि त्यांत काय वाईट होते ? लग्न म्हणजे का वाईट ? उलट अधिकच सेवा हातून होईल. निराशेंत धीर येईल. कोणी तरी आशा देणारें जवळ असेल. एकदम निराळे उमदे विचार कल्याण करूं लागला.