अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः ।

संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङगः शेवधिर्नृणामू ॥३०॥

म्हणों तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ ।

नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व ॥२५०॥

स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ जगा ।

ते गंगाही निजपापभंगा । तुमचे चरणसंगा वांछीत ॥५१॥

तुमची दर्शनसंग-चिद्गंगा । अत्यंत दाटुगी माजीं जगा ।

दर्शनमात्रें ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैंचें ॥५२॥

तेथें कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु ।

तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥५३॥

ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टिउत्संगीं वाढवा सकळ ।

आजि झालों मी अतिनिर्मळ । तुम्हीं दीनदयाळ मीनलेति ॥५४॥

ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्यें लाधलों हे संगती ।

सत्संगाची निजख्याती । सांगता श्रुति मौनावल्या ॥५५॥

ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखें ब्रह्मत्व ये ब्रह्मा ।

त्या सत्संगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥५६॥

सत्संग म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण ।

सत्संगाचें महिमान । साधकां संपूर्ण सद्रूप करी ॥५७॥

निधि सांपडलिया साङग । अत्यंत वाढे विषयभोग ।

तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषयें चांग सुखदाता ॥५८॥

इंद्रियांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु ।

ऐसा करिती निजबोधु । अगाध साधुनिजमहिमा ॥५९॥

निमिषार्ध होतां सत्संग । तेणें संगें होय भवभंग ।

यालागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥२६०॥

संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तुष्टती संत स्वयमेवो ।

संतसन्निधिमात्रें पहावो । संसार वावो स्वयें होय ॥६१॥

नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वें बाधी ।

त्या संसाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्संग ॥६२॥

दीपचिये संगप्राप्ती । निःशेष कापुरत्वाची शांती ।

तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धें ॥६३॥;

ते तुमची सत्संगती । भाग्यें पावलों अवचित्तीं ।

’आत्यंतिक क्षेम’ कैशा रीतीं । प्राणी पावती तें सांगा ॥६४॥

आत्यंतिक क्षेमाचें वर्म । जरी म्हणाल भागवतधर्म ।

त्या धर्माचा अनुक्रम । साङग सुगम सांगा जी ॥६५॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel