य एषां पुरुषं साक्षादात्मप्रभवमीश्वरम् ।

न भजन्त्यवजानन्ति स्थानाद्‍भ्रष्टाः पतन्त्यधः ॥३॥

हे ब्राह्मणादि वर्ण पहा हो । ज्यापासोनि जन्मप्रभवो ।

तो न भजतां देवोधिदेवो । उत्तमदेहो अधःपाती ॥५२॥

पूर्वोत्तरमीमांसा दोनी । नानाशास्त्रार्थकडसणी ।

स्वरुप बोलती निर्वचूनी । एवं शब्दज्ञानीं अतिचतुर ॥५३॥

यापरी जे पंडित । ज्ञानाभिमानें अतिउन्मत्त ।

तेणें अभिमानेंचि येथ । भजनीं निश्र्चित विमुख केले ॥५४॥

एक अज्ञानी सर्वथा । स्वप्नीं नेणती परमार्था ।

ते नेणपणेंचि तत्त्वतां । श्रीजगन्नाथा न भजती ॥५५॥

शेळी उंसाची चवी गाढी । नेणोनि पाचोळा करांडी ।

तेवीं नेणोनि हरिभक्तीची गोडी । अज्ञानें बापुडीं विषयलुब्ध ॥५६॥

आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातपणें जे पंडित ।

गर्वें हेळसिती भक्तिपंथ । अतिउन्मत्त ज्ञातृत्वें ॥५७॥

जेवीं ज्वरिताचें मुख । दूध मानी कडू विख ।

तेवीं ज्ञानगर्वें पंडित देख । ठेले विमुख हरिभजनीं ॥५८॥

यापरी ज्ञानाभिमानी । विमुख झाले हरिभजनीं ।

ते जरी वर्णांमाजीं अग्रगणी । तरी अधःपतनीं पडतील ॥५९॥

हो कां वर्णांमाजीं अग्रगणी । जो विमुख हरिचरणीं ।

त्याहूनि श्र्वपच श्रेष्ठ मानीं । जो भगवद्भजनीं प्रेमळु ॥६०॥

आम्ही मुक्त हें मानुनी । जे विमुख भगवद्भजनीं ।

ते पचिजती अधःपतनीं । तिर्यग्योनीं जन्ममरणें ॥६१॥

मनुष्यदेहीं जे भजननष्ट । ते होती गा स्थानभ्रष्ट ।

अधःपातें भोगिती कष्ट । अतिउद्भट यातना ॥६२॥

ज्ञानाभिमानें जे न भजती । ते प्रौढपतनीं पचिजती ।

अज्ञानांही तेचि गती । सर्वथा नृपती म्हणों नये ॥६३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel