शूद्रवृत्तिं भजेद्वैश्यः शूद्रः कारुकटक्रियाम् ।

कृच्छ्रान्मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥४९॥

वैश्यासी लागल्या अनुपपत्ती । तेणें धरावी शूद्रवृत्ती ।

निष्कपट सेवा यथास्थिती । तीं वर्णाप्रती करावी ॥६६॥

वैश्य पीडिल्याही अनुपपत्तीं । ब्राह्मण-क्षत्रियांची वृत्ती ।

सर्वथा धरूं नये हातीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥६७॥

वैश्यासी अतिअनुपपत्ती । मांडल्याही प्राणांतगती ।

तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थीं न करावी ॥६८॥

शूद्रासी लागलिया अनुपपत्ती । तेणेंही न करावी श्ववृत्ती ।

धरूनि बुरुडक्रिया हातीं । जीविकावृत्ती करावी ॥६९॥

विकावीं दोर दावीं शिंकीं । पाटे वरवंटे टवळीं निकीं ।

कां काष्ठें वाहावीं मस्तकीं । जीवीकेविखीं उदरार्थ ॥४७०॥

आपत्काळाचिये गती । चतुर्वर्णांची जीविकास्थिती ।

म्यां सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा श्ववृत्ती सांडावी ॥७१॥

एवं क्रमलिया अनुपपत्ती । म्यां सांगितल्या ज्या जीविकावृत्ती ।

तेथें देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हातीं न धराव्या ॥७२॥

आपत्काळींच्या आपद्‍वृत्ती । अनुतापें क्रमिल्याअंतीं ।

सांडूनियां स्वधर्मस्थितीं । यथानिगुतीं रहावें ॥७३॥

गृहस्थाचें विहित कर्म । त्यांतीलही आवश्यक धर्म ।

तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥७४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel