श्रीभगवानुवाच -
नह्यन्तोऽनन्तपारस्य कर्मकाण्डस्य चोद्धव ।
संक्षिप्तं वर्णयिष्यामि यथावदनुपूर्वशः ॥६॥
ज्याचें ऐकतां वचन । वेदवाक्या पडे मौन ।
ज्याची करितां आठवण । मनपणा मन स्वयें मुके ॥५०॥
जो वेदार्थप्रकाशक । जो अर्काचा आदि अर्क ।
तो उद्धवासी यदुनायक । स्वमुखें देख बोलत ॥५१॥
आगमनिगमोक्तप्रकार । माझी पूजाविधी सविस्तर ।
सांगतां अनंत अपार । न कळे पार ब्रह्मादिकां ॥५२॥
उद्धवा ऐक पां तत्त्वतां । मी देवादिदेव झालों वक्ता ।
तरी पूजाविधानकथा । समूळ सर्वथा न सांगवे ॥५३॥
जरी झाले अतिसज्ञान । तरी पूजाविधिविधान ।
सांगावया समर्थपण । सर्वथा जाण असेना ॥५४॥
एवं पूर्वोक्तप्रकार । आगमनिगमनिजसार ।
निवडूनि संक्षेपाकार । तुज मी साचार सांगेन ॥५५॥;
पूजाविधिनिजसार । त्रिविध विधान त्रिप्रकार ।
ऐक त्याचाही विचार । विधिउपचारविभागें ॥५६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.