ज्ञानिनस्त्वहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः ।

स्वर्गश्चैवापवर्गश्च नान्योऽर्थो मदृते प्रियः ॥२॥

जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानियांसी प्रीती ।

ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥४१॥

ज्ञानियांसी अतिवल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ ।

ज्ञानियांचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ॥४२॥

ज्ञानियांसी जो स्वर्ग चांग । तो मज वेगळा नाहीं मार्ग ।

ज्ञानियांचा जो मोक्षभाग । तो मी श्रीरंग निजात्मा ॥४३॥

ज्ञानियांचें स्वधर्मसाधन । तें मी परमात्मा नारायण ।

मजवेगळें कांहीं आन । ज्ञात्यांसी जाण असेना ॥४४॥

ज्ञात्यांसी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळें उरलें नाहीं देख ।

मी चिदात्मा निजव्यापक । भावें निष्टंक पावले ॥४५॥

ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त ।

आद्य अव्यय अनंत । माझें निजसुख प्राप्त त्यां जाहलें ॥४६॥

ऐशी ज्ञानियांसी माझी प्रीती । तेही तैसेच मज प्रिय होती ।

तेंचि स्वयें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥४७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel