पिण्डे वाय्वग्निसंशुद्धे, हृत्पद्मस्थां परां मम ।

अण्वीं जीवकलां ध्यायेन्नादांते सिद्धभाविताम् ॥२३॥

वायुबीजें आवाहूनी । पिंगला प्राण पूरुनी ।

तोचि कुंभकें स्तंभूनि । मात्राधारणीं धरावा ॥८२॥

वायु जो धारणा धरावा । तो जंव फुटेना अव्हासव्हा ।

तंवचि वरी निरोधावा । मग रेचावा शनैःशनैः ॥८३॥

ऐसें करितां प्राणधारण । स्वयें कल्पावें शरीरशोषण ।

शरीर शोषलें मानूनि जाण । देहदहन मांडावें ॥८४॥

आधारस्थित जो अग्नी । तो अग्निबीजें चेतवूनी ।

तोचि देह लावूनि दहनीं । भस्म मानूनी निजदेह ॥८५॥

देह दहनें अतिसंतप्त । तेथ चंद्रबीजें चंद्रामृत ।

आणोनि निववावे समस्त । नवा देह तेथ कल्पावा ॥८६॥

देह कल्पावा जो एथ । पूर्ण पाटव्य इंद्रिययुक्त ।

त्याच्या हृदयपद्माआंत । अण्वी जीवकळा तेथ पहावी माझी ॥८७॥

माझी जीवकळा परम । सूक्ष्माहूनि अति सूक्ष्म ।

यालागीं ’अण्वी’ तिचें नाम । विश्रामधाम जगाचें ॥८८॥

अकार उकार मकारस्थिती । यांतें प्रकाशे अण्वी जीवज्योती ।

ते तंव शब्दाहूनि परती । योगीं नादांतीं लक्षिजे ॥८९॥

ते देहीं सबाह्य परिपूर्ण । असोनि सूक्ष्मत्वें अलक्ष्य जाण ।

तीतें हृत्पद्मीं योगिजन । लक्षिती आसनप्राणायामें ॥१९०॥

ते अण्वी जीवकळा अव्यक्त । तीतें करोनियां व्यक्त ।

योगी निजभावनायुक्त । हृदयीं चिंतित महामूर्ती ॥९१॥

’नार’ जीवसमूह जाण । त्यांचें जें आयतनस्थान ।

ते महामूर्ति श्रीनारायण । हृदयीं सज्जन चिंतिती ॥९२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel