भगवान् पितामहं वीक्ष्य, विभूतीरात्मनो विभुः ।

संयोज्यात्मनि चात्मानं, पद्यनेत्रे न्यमीलयत् ॥५॥

देव पावले शीघ्रगतीं । ब्रह्मा देखिला संमुखस्थिती ।

सदाशिवसम विभूती । त्यांतेंही श्रीपती देखता जाहला ॥३८॥

इंद्रादिक निजविभूती । त्यांतें देखोनि श्रीपती ।

स्वनेत्र पद्मदलाकृती । ते सहजस्थितीं झांकिले ॥३९॥

झांकिले अथवा उघडे नयन । परी स्थिति नाहीं अधिक न्यून ।

तो आत्मा आत्मत्वें परिपूर्ण । तरी कां श्रीकृष्ण नयन झांकी ॥४०॥

देखोनि देवसमुदावो । कांहीं न बोलतां देवो ।

नेत्र झांकावया कोण भावो । तो अभिप्रावो अवधारा ॥४१॥

द्वारके असतां श्रीकृष्णनाथ । सुरवर प्रार्थूं आले तेथ ।

तिंहीं विनविला देवकीसुत । दास समस्त कृपा पाही ॥४२॥

स्वर्लोकादि लोकपाळ । आम्ही तुझे दास सकळ ।

निजधामा जातां एक वेळ । आश्रम सकळ पुनीत कीजे ॥४३॥

त्या समस्त देवांप्रती । स्वमुखें बोलिला श्रीपती ।

यदुकुळक्षयाचे अंतीं । येईन निश्चितीं तेणें मार्गें ॥४४॥

ऐकोनि श्रीकृष्णवंदती । सुरवर संतोषले चित्तीं ।

आम्हांसी वश्य जाहला श्रीपती । वचनोक्ती नुल्लंघी ॥४५॥

ते संधीचा ठाकून ठावो । आला सुरवरसमुदावो ।

त्याचा छळावया अहंभावो । निजनेत्र पहा हो हरि झांकी ॥४६॥

देवांचा बहु समुदावो । तेथ मी कोठकोठें जावों ।

त्यांसी ठकावया पहा हो । नेत्र झांकोनि देवो समाधि दावी ॥४७॥

नाहीं समाधि आणि व्युत्थान । कृष्ण परब्रह्म परिपूर्ण ।

तोही निजनेत्र झांकून । समाधिलक्षण मृषा दावी ॥४८॥

स्वच्छंदमृत्यु योगियांसी । ते स्थिति नाहीं श्रीकृष्णापाशीं ।

अतर्क्यगति शिवादिकांसी । ते परीक्षितीसी शुक सांगे ॥४९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel