अर्चादिषु यदा यत्र, श्रद्धा मां तत्र चार्चयेत‌ ।

सर्वभूतेष्वात्मनि च, सर्वात्माऽहमवस्थितः ॥४८॥

उद्धवा जे मूर्ति ज्या पढियंता । तेचि त्यासी पूज्य मूर्ती ।

तुवांही अणुमात्र चित्तीं । संदेह ये अर्थी न धरावा ॥६४॥

विष्णु विरिंचि सविता जाण । शिव शक्ति कां गजवदन ।

या मूर्तीमाजीं मी आपण । सर्वीं समान सर्वात्मा ॥६५॥

सर्व प्रतिमांचें पूजन । करितां मज पूजा समान ।

भक्तांची जेथ प्रीति गहन । तिये अधीन मी परमात्मा ॥६६॥

जेवीं बाळकाचेनि मेळें । माता तदनुकूल खेळे ।

तेवीं भक्तप्रेमाचिये लीळें । म्यां चित्कल्लोळें क्रीडिजे ॥६७॥

या सर्व भूतांच्या ठायीं । आणि अवतारादि लीलादेहीं ।

मी सर्वांसी समान पाहीं । ये अर्थी नाहीं संदेहो ॥६८॥

उद्धवा मी नाहीं ऐसें । कोणीही ठिकाण रितें नसे ।

परी प्राण्यांचें भाग्य कैसें । त्या मज विश्वासें न भजती ॥६९॥

जो जेथ मज भजों बैसे । त्या मी तेथ तैसाचि असें ।

हें उपासनाकांडविशेषें । गुप्त अनायासें प्रकाशिलें ॥३७०॥

उपासनाकांडींचा निर्वाहो । मी सर्वांभूतीं देवाधिदेवो ।

हा ज्यासी न कळे मुख्य भावो । त्यासी मूर्तिनिर्वाहो द्योतिला ॥७१॥

हो कां माझी प्रतिमामूर्ती । तेही मी चिदात्मा निश्चितीं ।

तेथ करितां भावें भक्ती । भक्त उद्धरती उद्धवा ॥७२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel