प्रायशः पुण्डरीकाक्ष, युञ्जतो योगिनो मनः ।

विषीदन्त्यसमाधानान्मनोनिग्रहकर्शिताः ॥२॥

ऐकें कृष्णा कमलनयना । शिणतां साधक साधना ।

कदा नाकळवे मना । तेही विवंचना अवधारीं ॥४७॥

निग्रहावया निजमन । साधक साधिती प्राणापान ।

त्यांसीही छळोनियां मन । जाय निघोन तत्काळ ॥४८॥

घालूनियां एकांतीं आसन । मनोनिग्रहीं जे सावधान ।

त्यांसीही ठकूनियां मन । जाय निघोन चपलत्वें ॥४९॥

मनोनिग्रहीं आम्ही हटी । म्हणोनि रिघाले गिरिकपाटीं ।

त्यांसीही ठकूनि मन शेवटीं । जाय उठाउठीं चपळत्वें ॥५०॥

एकीं आकळावया मन । त्यजूनि बैसले अन्न ।

तंव मनें केलें आनेआन । जागृति स्वप्न अन्नमय ॥५१॥

मनोनिग्रह करितां देख । मन खवळे अधिकाधिक ।

मनोनेमीं सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥५२॥

वारा बांधवेल मोटें । अग्नि प्राशवेल अवचटें ।

समुद्र घोंटवेल घोटें । परी आत्मनिष्ठे मन न ये ॥५३॥

आकाश करवेल चौघडी । महामेरु बांधवेल पुडीं ।

शून्याची मुरडवेल नरडी । परी या मनाच्या वोढी अनिवार ॥५४॥

काळ जिंकवेल तत्त्वतां । त्रिभुवनींची लाभेल सत्ता ।

परी मनोनिग्रहाची वार्ता । तुजवीण अच्युता घडे केवीं ॥५५॥

मन तापसां तत्काळ छळी । मन नेमस्तांचा नेम टाळी ।

मन बळियांमाजीं महाबळी । करी रांगोळी धैर्याची ॥५६॥

मन इंद्रातें तळीं पाडी । मन ब्रह्मयातें हटेंचि नाडी ।

ऐशी मनाची वोखटी खोडी । आपल्या प्रौढीं नावरे ॥५७॥

साधनीं साधक शिणतां । मनोजयो न येचि हाता ।

तुजवांचूनि अच्युता । मना सर्वथा नावरे ॥५८॥

अत्यंत साधूनि निरवडी । मनोजयो आणितां जोडी ।

तंव सिद्धींची दाटे आडाडी । तेणेंही मन नाडी साधकां ॥५९॥

तुझी कृपा नव्हतां जाण । साधकां कदा नावरे मन ।

तूं तुष्टल्या जनार्दन । मनपणा मन स्वयें विसरे ॥६०॥

सर्वभावें न रिघतां शरण । साधकां कदा नावरे मन ।

मनोनिग्रहार्थ जाण । तुझे चरणा शरण रिघावें ॥६१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel