उत्पत्त्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च ।

आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥२४॥

न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि ।

कथं युञ्ज्यात्पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥२५॥

उपजतांचि प्राणिमात्रासी । देह आवडे सर्वस्वेंसीं ।

देहात्मवादें विषयांसी । जीवेंप्राणेंसीं लोलुप ॥४७॥

विषयकामाच्या आसक्तीं । स्त्रीपुत्रांची गोडी चित्तीं ।

स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिती अनिवार ॥४८॥

जेणें जाइजे अधोगती । ऐशी जे कां कामासक्ती ।

ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ती स्वभावें ॥४९॥

तेचि विषयांची प्रवृत्ती । वेद बोले जैं विध्युक्ती ।

तैं सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थीं वेदवादु ॥२५०॥

मरतया तरटमारु केला । बुडत्याचे डोयीं दगड दीधला ।

आंधळा अंधकूपीं घातला । तैसा वेदु झाला अनर्थीं ॥५१॥

वेदु जैं विषयीं गोंवी । तैं प्राण्यातें कोण उगवी ।

राजा सर्वस्वें नागवी । तैं कोण सोडवी दीनतें ॥५२॥

नेणोनि वेदींचा मथितार्थु । स्वयें जो कां विषयासक्तु ।

तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थु अनर्थहेतु बालिशां ॥५३॥

पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रहणीं जेवूं परमान्न ।

येरू म्हणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करूं ॥५४॥

तैशी माझ्या वेदाची उक्ती । निषेधमुखें दावी प्रवृत्ती ।

येणें वेदाच्या मनोगतीं । विषयनिवृत्ती मुख्यत्वें ॥५५॥

विषयीं बुडते जे जन । त्यांचें करावया उद्धरण ।

माझा वेदवादु जाण । सकामपण त्या नाहीं ॥५६॥

कोणी एक मंदबुद्धी । केवळ विषयांध त्रिशुद्धी ।

ते सकाम जल्पती वेदविधी । त्यांची कुबुद्धी हरि सांगे ॥५७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel