कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः ।

अग्निमुग्धा धूमतान्ता स्वं लोकं न विदन्ति ते ॥२७॥

सकामाची तृष्णा पूर्ण । कदाकाळीं नव्हे जाण ।

काचेच्छा तो सदा दीन । `कृपणपण' या हेतू ॥७३॥

जळीं बक धरोनि ध्यान । जेवीं कां टपत राहे मीन ।

तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी ॥७४॥

जावया परपुरुषापासीं । लवोठवो दावी निजपतीसी ।

तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥७५॥

जेवीं कां अज्ञान बाळ । फूल तेंचि म्हणे फळ ।

तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अढळ मूर्खत्वें ॥७६॥

त्याही स्वर्गभोगासी पाहें । कर्मवैकल्य होय कीं नोहे ।

हाही संदेह वर्तताहे । तेणेंही होय अतिदीन ॥७७॥

सकाम तो सदा दीन । दीनत्वें अतिकृपण ।

कृपणत्वें स्लोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥७८॥

मोहाचें खवळल्या भान । सविवेक ग्रासी ज्ञान ।

तेव्हां बुद्धीमाजीं तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥७९॥

तमें कोंदाटल्या वृत्ती । धूमांकित होय स्थिती ।

जेवीं कां आंधळ्याचा सांगती । अंधारे रातीं आडवीं चुके ॥२८०॥

त्या आंधळ्याची जैशी स्थिती । तैशी सकामाची गती ।

चुकला विवेकाचा सांगती । आंधळी वृत्ती अतिमुग्ध ॥८१॥

जैसें कां अज्ञान बाळ । तैसा मुग्ध होय केवळ ।

कोण कर्म काय तें फळ । नेणे विवळ मुग्धत्वें ॥८२॥

माझी कोणे लोकीं स्थिती । पुढें कोण आपुली गती ।

हें कांहींच न स्मरे चित्तीं । धूम्रवृत्ती देहांतु ॥८३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel