यो यो मयि पर धर्मः; कल्पते निष्फलाय चेत् ।

तदासायो निरर्थः स्याद्भयादेरिव सत्तम ॥२१॥

व्यवहारार्थ जो प्रयास केला । जो न फळतां व्यर्थ गेला ।

तोही जैं परब्रह्मीं अर्पिला । तैं मद्भजनीं लागला सद्भावें ॥९१॥

शिमगियाचा महासण । तेथ खेळ खेळला जो आपण ।

तोही केल्या कृष्णार्पण । तेही भक्ति जाण मज अर्पे ॥९२॥

चोराभेणें लपतां वनीं । निधान आतुडे ज्यालागूनी ।

तेवीं व्यर्थ कर्मही मदर्पणीं । करितां मद्भजनीं महालाभ ॥९३॥

नासलें तें सांडितां क्षितीं । तेंही लागे माजे भक्तीं ।

जरी ब्रह्मार्पण चित्तीं । साधक निश्चितीं दृढ मानी ॥९४॥

कडू भोंपळ्याची खिरी । उपेगा न ये श्वानसूकरीं ।

ते उल्हासें कृष्णार्पण करी । तेही निर्धारीं ब्रह्मीं अर्पे ॥९५॥

जें हारपलें न दिसे । जें सहजें उडे काळवशें ।

तेंही लाविल्या मदुद्देशें । होय अनायासें मदर्पण ॥९६॥

सकळ सारांचें सार पूर्ण । कर्ममात्र कृष्णार्पण ।

साक्षेपें करावें आपण । ’सद्बुद्धि’ संपूर्ण या नांव ॥९७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel