प्रोक्तेन भक्तियोगेन, भजतो माऽसकृन्मुनेः ।

कामा हृदय्या नश्यन्ति, सर्वे मयि हृदि स्थिते ॥२९॥

माझी जे कां निजभक्ती । मागां सांगितली तुजप्रती ।

त्या हातवटिया मीं श्रीपती । यजिलों अतिप्रीतीं वारंवार ॥६४॥

पळपळ क्षणक्षण । माझें न विसरत स्मरण ।

करिती अनन्य भजन । मदर्पण तें मीचि ॥६५॥

दिवसदिवसां चढोवढी । अनिवार प्रीति वाढे गाढी ।

लागतां नीच नवी गोडी । भजे आवडीं पुनःपुनः ॥६६॥

केलीचि भक्ती करितां । उबगु न ये सर्वथा ।

अधिक हर्ष वाटे चित्ता । उल्हासता मद्भजनीं ॥६७॥

मज आकळूनि आपले मनीं । मनींहोनि प्रीति भजनीं ।

तेथ सकळ काम जाती नासोनी । जेवीं कां तरणीं खद्योत ॥६८॥

जेवीं कां केसरी देखोनी । मदगजां होय भंगणी ।

तेवीं काम जाती हृदयींहूनी । मी चक्रपाणी प्रकटल्या ॥६९॥

’मी प्रकटलों’ ऐसें म्हणतां । लाज लागेल या वचनार्था ।

मजवीण ठावो नाहीं रिता । ’प्रकटलों’ आतां म्हणे कोण ॥३७०॥

उद्धवा जाण तत्त्वतां । मी सदा हृदयीं वसता ।

भक्तांची भ्रांती जातां । मी स्वभावतां प्रकटचि ॥७१॥

भक्तीं करुनि माझी भक्ती । नाशिली गा निजभ्रांती ।

तेथ स्वयंभ मी श्रीपती । सहजस्थितीं प्रकटचि ॥७२॥

मी हृदयीं प्रकटल्यापुढें । भक्तांसी अलभ्य लाभ जोडे ।

फिटे संसाराचें सांकडें । ऐक पां फाडोवाडें सांगेन ॥७३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel