वेदाध्यायस्वधास्वाहाबल्यन्नाद्येर्यथोदयम् ।

देवर्षिपितृभूतानि मद्‌रूपाण्यन्वहं यजेत् ॥५०॥

स्वाध्याय `वेदाध्ययन' । वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ ।

`स्वधा' म्हणिजे पितृतर्पण । `स्वाहा' जाण देवतादिकां ॥७५॥

बळिदानादिकीं जाण । तृप्त होय `भूतगण' ।

`मनुष्यांसी' अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥७६॥

हेंचि ब्रह्मकर्म जाण । जेणें होय व्रह्मार्पण ।

त्या अर्पणाची निजखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥७७॥

मी एक कर्मकर्ता येथें । हें सांडोनियां निजचित्तें ।

भगवद्‌रूप भावितां भूतें । ब्रह्मार्पण तेथें होय कर्म ॥७८॥

सांडितां कर्माभिमान । कर्म होय ब्रह्मार्पण ।

हें संकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धवा ॥७९॥

माझेनि हें कर्म जाहलें । तें म्यां कृष्णार्पणा केलें ।

येणें संकल्पाचेनि बोलें । अंगा आलें कर्तृत्व ॥४८०॥

जो म्हणे मी कर्मकर्ता । तो होय कर्मफळभोक्ता ।

मुख्य बाधक ते अहंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८१॥

ज्याच्या ठायीं अहंममता । त्याचे अंगीं नित्यबद्धता ।

जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुक्तता त्यापाशीं ॥८२॥

यालागीं सांडूनि अभिमान । पंचमहायज्ञाचरण ।

गृहस्थें प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥८३॥

जैसेनि अर्पे भगवंता । ते गृहस्थाची नित्यकर्मता ।

तुज म्यां सांगितली तत्त्वतां । यज्ञादि कथा ते ऐक ॥८४॥

यज्ञ करावया अधिकारवंत । गांठी शुद्ध बारा सहस्त्र अर्थ ।

ज्यासी वेदीं ज्ञान यज्ञान्त । तेचि येथ अधिकारी ॥८५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel