श्रीभगवानुवाच -

परस्वभावकर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत् ।

विश्वमेकात्मकं पश्यन्प्रकृत्या पुरुषेण च ॥१॥

जो निःशब्दाचा सोलींव शब्द । ज्याचे निश्वासें जन्मले वेद ।

उद्धवहितार्थ गोविंद । ज्ञान विशुद्ध स्वयें सांगे ॥४५॥

संसारीं मुख्य तिन्ही गुण । त्रिगुणांस्तव त्रिविध जन ।

त्यांचें स्वाभाविक कर्म जाण । शांत दारुण आणि मिश्र ॥४६॥

त्या कर्मांचें निंदास्तवन । सर्वथा न करावें आपण ।

एकाचें वानितां भलेपण । इतरां कुडेपण तेणेंचि बोलें ॥४७॥

पांचांमाजीं भलेपण । एकाचें वानितां आपण ।

इतर जे चौघेजण । ते सहजें जाण निंदिले ॥४८॥

वामसव्य उभय भाग । दों नांवीं एकचि अंग ।

तेवीं प्रकृतिपुरुषात्मक जग । चिद्रूपें चांग एकत्वें ॥४९॥

जग ब्रह्मरुप परिपूर्ण । यालागीं निंदा आणि स्तवन ।

भूतमात्राचें आपण । कदाही काळीं जाण न करावें ॥५०॥

सर्व भूतांच्या ठायीं । आत्माराम असे पाहीं ।

यालागीं निंदास्तुति कांहीं । प्राणांतीं पाहीं न करावी ॥५१॥

उद्धवा निंदास्तुतीची कथा । सांडी सांडीं गा सर्वथा ।

तरीच पावशी परमार्था । निजस्वार्था निजबोधें ॥५२॥

सर्वभूतीं भगवद्भाव । हा ब्रह्मस्थितीचा निज निर्वाह ।

यासी कदा नव्हे अपाव । ऐक तो भाव उद्धवा ॥५३॥

जेथूनि येवूं पाहे अपाव । तेथें दृढ वाढल्या भगवद्भाव ।

तेव्हां अपावचि होय उपाव । विघ्नासी ठाव असेना ॥५४॥

हे स्थिती सांडूनियां दूरी । मी ज्ञाता हा गर्व धरी ।

निंदास्तुतीच्या भरोवरी । तो अनर्थामाझारीं निमग्न ॥५५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel