ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता ।

कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥३८॥

इतर कवींची वदंती । `ऋत' या नांव सत्य म्हणती ।

हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥६३॥

ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित ।

तेंही दुःखसंबंधरहित । `ऋत' निश्चित या नांव ॥६४॥

चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम ।

तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥६५॥

या नांव गा `सत्य' जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न ।

त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥६६॥

नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण ।

अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥६७॥

अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन ।

कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥६८॥

ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा ।

यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥६९॥

नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन ।

या नांव गा शौच जाण । `शौच' संपूर्ण नैराश्यें ॥७०॥

`शौच' शुद्ध‍अंतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं ।

यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥७१॥

सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं `संन्यास' चांग ।

ऐसें बोलिला तो श्रीरंग । `त्याग' तो चांग या नांव ॥७२॥

मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी ।

बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥७३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel