नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचिन्मृत्युमात्मनः ।

बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥१४॥

क्रीडतां गजींमाजीं गजपती । त्यावरी सबळ भद्रजाती ।

येऊनियां युद्ध करिती । निजबळें मारिती तयातें ॥३२॥

तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती ।

सबळ भोगी भद्रजाती । नाशाप्रती स्त्री मूळ ॥३३॥

अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती ।

भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥३४॥

देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधु ।

स्त्रीअभिलाषें चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥३५॥

मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं ।

शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥३६॥

ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां ।

तेणें शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥३७॥

एवं सुरनरपशूंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती ।

तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥३८॥

ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणें । तो बैसला मरणा धरणें ।

मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणें स्त्रीसंगु ॥३९॥

वेश्येचे संगती जातां । बळाधिक्य करी घाता ।

निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हें न म्हणे ॥१४०॥

अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता ।

उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥४१॥

एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी ।

क्वचित्संगु जाल्यावरी । नरकद्वारीं घालील ॥४२॥

नरकीं घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा ।

नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥४३॥

स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकीं घोर अनर्थु ।

येणें अंतरला निजस्वार्थु । शेखीं करी घातु प्राणाचा ॥४४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel