सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः ।

वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो शृणु ॥५॥

सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती ।

त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥१००॥

मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती ।

तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥१॥

मिळोनि सख्या मायाबहिणी । हातीं घेऊनि तेल फणी ।

उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥२॥

त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती ।

तरी शुद्धसत्वीं करुनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥३॥

ऐसा निजागुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो ।

यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥४॥

जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी ।

विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥५॥

ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती ।

यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासी ॥६॥

एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती ।

गुंती उगवाया न रिघती । मुळींचि मुंडिती समूळ ॥७॥

विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें ।

जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥८॥

अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोहअंधारीं ।

एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥९॥

एकें अत्यत करंटीं । नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी ।

ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥११०॥

द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता ।

मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥११॥

ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती ।

यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्र्लोकार्थीं बोलिला ॥१२॥

मागिल्या तीं श्र्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती ।

त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel