धर्मो मद्‍भक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् ।

गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥२७॥

ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम ।

माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम `धर्म' तो जाण ॥४९॥

ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद ।

या नांव गा `ज्ञान' शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥३५०॥

धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी ।

तें अवघें तृणप्राय ज्यासी । `वैराग्य' त्यासी आम्ही म्हणों ॥५१॥

ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी ।

त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥५२॥

माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं ।

माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥५३॥

सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती ।

श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥५४॥

`ऐश्वर्याचें मुख्य लक्षण' । अतिशयेंसी संपूर्ण ।

भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥५५॥

म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली ।

येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥५६॥

चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें ।

ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥५७॥

धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ ।

तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥५८॥

गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न ।

उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥५९॥

पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन ।

ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥३६०॥

पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्‍यामाजीं नव जाण ।

तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥६१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel